Pune : बाजीराव पेशव्यांची पाटी लोकवर्गणीतून पुण्यातील ब्राह्मण महासंघ लावणार ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजीराव पेशव्यांची पाटी लोकवर्गणीतून पुण्यातील ब्राह्मण महासंघ लावणार !

बाजीराव पेशव्यांची पाटी लोकवर्गणीतून पुण्यातील ब्राह्मण महासंघ लावणार !

पुणे : थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाची पाटी बाजीराव रस्त्यावर लावण्यासाठी पैसे नसतील तर, ब्राह्मण महासंघ त्यासाठीचा निधी देण्यास तयार असल्याचे स्पष्टीकरण संघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केले आहे. बाजीराव रस्त्याला थोरले बाजीराव यांचे नाव असलेली पाटी सुमारे अडीच वर्षांपूर्वी महापालिकेने काढली. या रस्त्यावर सणस प्लाझासमोर ही पाटी होती. ती पुन्हा बसवावी, यासाठी पेशव्यांच्या वंशज आदिती अत्रे पाठपुरावा करीत आहेत.

परंतु, महापालिकेच्या विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पाटी लावण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगितले. तसेच पाटी लावण्यासाठी तुम्हीच प्रायोजक शोधल्यास आम्ही पाटी लावू, अशीही भूमिका त्यांनी घेतली आहे. महापालिकेचा हा अनुभव संतापजनक असल्याचे सांगत अत्रे यांनी सकाळशी संपर्क साधला. या बाबतचे वृत्त ई-सकाळवर प्रसिद्ध झाले. पुणे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी तातडीने पुढाकार घेतला. या बाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ‘बाजीराव पेशवे यांच्या नावाची पाटी पेशवे रस्त्याला लावण्याच्या विनंतीला उत्तर देताना महापालिकेचे अधिकारी पैसे नाहीत, हे उत्तर न पटणारे आहे. त्या पुढे जाऊन आपण जर प्रायोजक आणला तर नाव देण्याचा प्रयत्न करू असं सांगणे म्हणजे हा तर महापालिकेचा करंटेपणा आहे.

महापालिकेची नवी इमारत बांधायला, फुटकळ कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करायला, शोभेची वृक्षसंपदा खरेदी करण्यास महापालिकेकडे निधी आहे. परंतु, एक पाटी लावण्यासाठी पैसे नाहीत, हे संतापजनक आहे. हिंदवी साम्राज्य ज्यांनी दिल्लीतच नव्हे तर त्या पुढे अटक पर्यंत नेले, त्यांच्या नावाची पाटी लावण्यासाठी महापालिकेकडे पैसे नसतील तर, ब्राह्मण महासंघ लोक वर्गणीतून ही पाटी लावण्यास तयार आहे. महापालिकेने आम्हाला केवळ जागा द्यावी, या मागणी ब्राह्मण महासंघचे पदाधिकारी महापौर मुरलीधर मोहोळ आणि अधिकाऱ्यांची सोमवारी भेट घेणार आहेत.’ बाजीराव रस्त्यावर थोरले बाजीराव यांच्या नावाची पाटील येत्या ८ दिवसांत लागली नाही तर, ब्राह्मण महासंघ तीव्र आंदोलन करेल, असेही दवे यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top