माळेगाव कारखान्याची सूत्रे अजित पवारांकडे; कट्टर समर्थकांकडे अध्यक्ष, उपाध्यक्षपद 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 March 2020

माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पाटील तावरे यांची आज बिनविरोध निवड झाली.

माळेगाव (पुणे) : माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पाटील तावरे यांची आज बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी तानाजी तात्यासाहेब कोकरे यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. नवनिर्वाचित अध्यक्ष तावरे व उपाध्यक्ष कोकरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. पवार यांनी वरील दोन्ही अनुभवी चेहऱ्यांना संधी देत आपले `माळेगाव`वर पुन्हा वर्चस्व प्रस्तापित केले. विशेषतः बाळासाहेब तावरे यांनी अध्यक्षपदावर टप्पापद्धतीने सुमारे १४ वर्षे असे सर्वाधिक काळ काम केल्याची नोंद आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माळेगाव कारखान्याची २५ फेब्रूवारी रोजी पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. या निवडणूकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निलकंठेश्वर पॅनलचा विजय झाला होता. २१ पैकी १७ जागा जिंकत पवार यांनी `माळेगाव`ची सत्ता खेचून आणली. मावळते अध्यक्ष व पवारांचे विरोधक रंजन तावरे, संचालक चंद्रराव तावरे यांना वरील निवडणूकीत स्वतःसह चार जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे सभागृहात विरोधक म्हणून पुढे येणारे हे दोन्ही अनुभवी चेहरे, कारखाना विस्तारिकरणातील राहिलेल्या काही तृटी, राष्ट्रवादी पक्षाचे एकनिष्ठ केलेले काम आदी बाबी विचारात घेत अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्यातर्फे बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे यांची नावे सूचविले. त्यानुसार आज (रविवारी) निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज हिरे यांच्याकडे अध्यक्षपदासाठी बाळासाहेब तावरे, तर उपाध्यक्षपदासाठी तानाजी कोकरे यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. 

आणखी वाचा - या देशातल्या महिला आहेत सगळ्यांत जास्त जाड

दरम्यान, बाळासाहेब तावरे म्हणाले, ``काटकसरीबरोबरच विस्तारिकरणातील तृटी भरून काढत दर्जदार साखर उत्पादन करणे, रिकव्हरी लाॅस कमी करून उपपदार्थ निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविणे यापुढे आव्हानात्मक आहे. हे सगळे पुर्णत्वाला आणून सभासदांना विक्रमी दर देण्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह संचालक मंडळाचे सहकार्य नक्की लाभेल,`` अशा शब्दात त्यांनी संबंधितांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तत्पुर्वी रंजन तावरे यांनीही गेली पाच वर्षात सभासदांना सर्वाधिक ऊस दर देत कारखान्याचे महत्वकांक्षी विस्तारिकरण यशस्वी केल्याचे सांगितले. यावेळी रमेश गोफणे, विश्वास देवकाते, योगेश जगताप, प्रकाश देवकाते, केशवराव जगताप, राजेंद्र ढवाण, सुरेश खलाटे आदींनी नविन व जुन्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा - आता काश्मीरमध्येही घुसला कोरोना; वाचा कोठे काय परिस्थिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: balasaheb taware become president malegaon sugar factory ajit pawar