esakal | आता काश्मीरमध्ये घुसला कोरोना; वाचा देशभरात कुठं काय घडलंय!
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus india update three patients jammu kashmir total toll 34

कोरोनाच्या भीतीचा गैरफायदा घेत काही औषध विक्रेते दुप्पट किमतीला मास्कची विक्री करत असल्याचा प्रकार उघड झाला होता. या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

आता काश्मीरमध्ये घुसला कोरोना; वाचा देशभरात कुठं काय घडलंय!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Coronavirus : देशावरील कोरोना विषाणूचे सावट आणखी गडद होऊ लागले असून देशाचे नंदनवन असणाऱ्या जम्मू-काश्‍मीरमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. पंजाबमध्येही दोघांना या विषाणूची बाधा झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ३४ वर पोचल्याने सरकार आणि आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. स्वच्छता राखा, अफवांवर विश्‍वास ठेवू नका, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज या विषाणूचा सामना करण्यासाठी अभिवादन पद्धतीमध्ये बदल करण्याबरोबरच लोकांनी अफवावांवर विश्‍वास ठेवू नये, असे म्हटले आहे. विविध दूरसंचार कंपन्यांनी रिंगटोनच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करायला सुरवात केली आहे.

चिंताजनक : उन्हाळ्यातही कोरोना कमी होणार नाही

कोरोनाच्या भीतीचा गैरफायदा घेत काही औषध विक्रेते दुप्पट किमतीला मास्कची विक्री करत असल्याचा प्रकार उघड झाला होता. या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर त्याचे लवकर योग्य निदान व्हावे म्हणून देशभर ५२ प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सहा मार्चपर्यंत विविध प्रयोगशाळांमध्ये ४ हजार ५८ नमुन्यांची चाचणी घेण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. सरकारने आज परदेशांत जाणाऱ्या पर्यटकांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. कोरोनाग्रस्त देशांपासून दूर राहण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या असून तीन मार्चपूर्वी ज्यांना व्हिसा देण्यात आला आहे, पण जे अद्याप भारतात आलेले नाहीत अशा इटली, इराण, दक्षिण कोरिया, जपान आदी देशांच्या नागरिकांसाठी भारताची दारे बंद करण्यात आली आहेत. 

पीएम_पनौती ट्विटरवर सुरू झाला ट्रेंड


निरोगी माणसांनी मास्क घालण्याची गरज नाही, कोरोनाचा विषाणू केवळ दोन मीटरपर्यंतच पसरू शकतो. ‘एन-९२’ हा मास्कदेखील केवळ कोरोनाच्या रुग्णांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनीच घालावा. 
- रणदीप गुलेरिया, संचालक एम्स 

देशभरात काय घडले?

  • राजस्थानातील रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह 
  • सुरतमधील हिरे व्यवसायाला फटका 
  • पश्‍चिम दिल्लीत अकरा जणांना वेगळे ठेवले 
  • गुडगावमध्ये डीएलएफच्या कार्यालयात 
  • व्यवस्थापनाने इन्फ्रारेड थर्मामीटर बसविले 
  • कर्नाटकात बायोमेट्रिक उपस्थिती बंद 
  • जम्मूतील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद राहणार 
  • स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी 
  • सरकार घेणार बीएसएनएल, जिओची मदत