पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने बालस्नेही ग्रामपंचायत हा अनोखा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने बालस्नेही ग्रामपंचायत हा अनोखा उपक्रम

पुणे : पुणे जिल्ह्यातील गावां-गावांमधील प्रत्येक बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी, बालकांना अधिक सुरक्षित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने बालस्नेही ग्रामपंचायत हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पंचायतराजदिनाच्या निमित्ताने घेण्यात येत असलेल्या मुख्य ग्रामसभांच्या आदल्या दिवशी (एक दिवस आधी) प्रत्येक गावात बालसभा आणि बालपंचायतींचे आयोजन केले जाणार आहे.

बालमजुरी, बालविवाहाला प्रतिबंध घालणे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्यासाठी असलेल्या सरकारी योजनांची त्यांना माहिती देणे आणि कोरोनामुळे निराधार झालेल्या बालकांच्या विकासासाठी आवश्‍यक योजनांची अंमलबजावणी करणे आदी विषयांवर या बालसभांमध्ये चर्चा केली जाणार आहे. या बालसभांसाठी जिल्ह्यातील अकरा ते १८ वयोगटातील सर्व बालकांना सामावून घेतले जाणार आहे.

दरवर्षी २४ एप्रिल हा पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसांचे औचित्य साधून या बालसभा आयोजित केल्या जाणार आहेत. या सभांसाठी उपस्थित असलेल्या बालकांची गावनिहाय उपस्थिती यादी, त्यांनी बालसभेत मांडलेले विषय यांची एका रजिस्टरमध्ये नोंद केली जाणार आहे. या बालसभांमध्ये बालकांनी मांडलेल्या समस्या, चर्चा आणि विषयांची नोंद केली जाणार आहे. बालकांनी त्यांच्या सभेत मांडलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मुख्य ग्रामसभांमध्ये या समस्या मांडल्या जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सचिन घाडगे यांनी सांगितले.

सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील बालकांच्या स्थितीची माहिती व्हावी, यासाठी बालकांच्या हक्काविषयी जनजागृती करणे, संवेदनशीलता तपासणे, नागरिकांना उत्तरदायित्वाची जाणीव करून देणे, बालकांच्या हक्कांविषयीची सद्यःस्थिती जाणून घेणे, बालकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्‍यक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करणे आणि या कृती आराखड्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे, हा बालसभांचा मुख्य उद्देश असल्याचेही घाडगे यांनी यावेळी स्पष्ट केले.

बालसभांमधील चर्चेचे मुख्य विषय

 • बालविवाह, बालमजुरी, कोरोनामुळे निर्माण झालेल्या बालकांच्या समस्या व उपाययोजना

 • बालकांचे हक्क व त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी

 • बालकांसाठीच्या सरकारी योजना

 • सरकारी योजनांच्या लाभासाठी पात्र बालकांची गावनिहाय यादी तयार करणे

 • गावांच्या विकासाच्या निर्णय प्रक्रियेत बालकांचा प्रत्यक्ष सहभाग

 • बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी गावनिहाय पोषक वातावरणनिर्मिती करणे

 • बालहक्कांच्या सुरक्षेसाठीची झेडपीची कार्यपद्धती

 • जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालसभा, बालपंचायतींचे आयोजन करणे

 • ग्रामपंचायत व बालपंचयातीद्वारे गावांचा नियमित बाललेखाजोखा मांडणे

 • महिलासभा व ग्रामसभांद्वारे बाल लेखाजोख्यावरील कार्यवाहीबाबतचा ठराव मांडणे

 • ग्रामपंचायतीद्वारे गावनिहाय बालविकास कृती आराखडा तयार करणे

 • बालविकास कृती आराखड्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे

गावांना आपापल्या शाश्वत विकासाचे ध्येय येत्या २०३० पर्यंत गाठायचे असेल तर, त्यांनी प्रथम बालकांच्या हक्कांवर काम करणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी आपापली ग्रामपंचायत ही बालस्नेही बनवणे अपेक्षित आहे. यासाठी यंदापासून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, पुणे.

Web Title: Balasnehi Gram Panchayat Unique Initiative Behalf Pune Zilla Parishad Protect Rights Every Child Village

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top