
Pune Crime: केळी पडली महागात ! भाव कमी केले नाही म्हणून विक्रेत्याचे तोडले नाक
Pune Crime News: पुण्यात शुल्लक कारणावरून ग्राहक आणि केळी विक्रेत्यामध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. केळीचे भाव कमी केले नाही म्हणून थेट टोळक्याने विक्रेत्याच्या नाकाचे हाड तोडले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Banana seller beaten)
पुण्यातील गोखलेनगर परिसरात ही घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. या घटनेबाबत केशव आंद्रे (२१) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी ५ ते ६ अज्ञात तरुणांवर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आंद्रे हे मूळचे मुंबईतील घाटकोपर चे आहेत. ते पुण्यात गोखलेनगर या भागात केळी विक्रेता म्हणून व्यवसाय करतात. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ५ ते ६ तरुण फिर्यादी यांच्या केळीच्या हातगाडीवर गेले आणि केळी मागितली.
भाव कमी करण्याची मागणी केली असता विक्रेत्याने नकार देताच या गोष्टीचा राग मनात धरून या टोळक्याने त्यांना हाताने आणि दगडाने मारहाण केली. या मारहाणीत या तरुणांनी केळी विक्रेत्याच्या नाकावर मारले असता त्यांच्या नाकाचे हाड मोडले आणि त्यात ते जखमी झाले.
या प्रकरणी अज्ञात तरुणांवर भारतीय दंडात्मक कलम १४३,१४७,३२५, १४८,१४९ अन्वये चतुशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.