बॅंकांनी विश्‍वास कायम राखावा - रामनाथ कोविंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्‍यक
दिव्यांग व्यक्तींशी साधलेल्या संवादातून त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता दिसून आल्याचे सांगून राष्ट्रपती म्हणाले, ‘‘दिव्यांग व्यक्तींना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के लोक दिव्यांग आहेत. बॅंकिंग क्षेत्राने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत.’

पुणे - सार्वजनिक पैशाचे संरक्षक म्हणून बॅंकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. यामुळे जनतेचा बॅंकांवर असलेला विश्‍वास कायम ठेवण्यासाठी बॅंकांनी प्रयत्नशील राहणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘नॅशनल इस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग अँड मॅनेजमेंट’च्या (एनआयबीएम) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते. या वेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, परिवहन तथा संसदीय कार्यमंत्री अनिल परब, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास, ‘एनआयबीएम’चे संचालक डॉ. के. एल. धिंग्रा उपस्थित होते. पुढे बोलताना राष्ट्रपती म्हणाले, ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी बॅंकिंग क्षेत्रासमोर अनेक आव्हाने होती. त्या वेळी ग्रामीण भागात बॅंकिंग व्यवस्था पोचली नव्हती. मात्र, ‘एनआयबीएम’सारख्या संस्थांनी प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळाची निर्मिती करून बॅंकिंग व्यवस्था बळकट केली. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी बॅंकांच्या जेवढ्या शाखा होत्या तेवढ्या शाखा आता बॅंकांकडून दरवर्षी सुरू केल्या जातात. भारताचे पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यामध्ये बॅंकांची महत्त्वाची भूमिका ठरेल.’’ 

‘ग्रामीण भागात मुख्यतः गरीब लोकांना बॅंकिंग सेवा उपलब्ध होत नव्हती. मात्र, जनधन योजनेमुळे बॅंकिंग सेवा तळागाळात पोचली आहे. जनधन योजनेंतर्गत आत्तापर्यंत ३५ कोटी खाती उघडण्यात आली आहेत. मुद्रा योजनेच्या माध्यमातून बॅंकांनी गरजू उद्योजकांना निधी उपलब्ध करून द्यावा. देशातील शेवटच्या नागरिकापर्यंत बॅंकिंग सेवा पोचविणे आवश्‍यक आहे,’’ असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banks should maintain their trust ramnath kovind