esakal | Baramati : कोविडच्या संभाव्य तिस-या लाटेसाठी बारामतीत प्रशासन सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

corona

Baramati : कोविडच्या संभाव्य तिस-या लाटेसाठी बारामतीत प्रशासन सज्ज

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : संभाव्य कोविडच्या तिस-या लाटेची शक्यता गृहीत धरुन बारामतीत प्रशासनाच्या वतीने पुरेशी तयारी करण्यात आली आहे. दुस-या लाटेदरम्यान आलेल्या अडचणींच्या अनुषंगाने रुग्णांसाठी बेडस, ऑक्सिजन व व्हेंटीलेटर्सची संख्या अपुरी पडू नये या साठी आरोग्य विभाग सज्ज आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे व रुईचे अधीक्षक डॉ. सुनील दराडे यांनी ही माहिती दिली.

बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयासह रुई ग्रामीण रुग्णालय व महिला रुग्णालयाशेजारील नर्सिंग वसतिगृहाच्या ठिकाणी नव्याने सुरु झालेल्या रुई रुग्णालयामागील बाजूस शंभर खाटांची क्षमता असलेले मोड्युलर हॉस्पिटल येथे रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयातही कॅपजेमिनी कंपनीच्या सहकार्याने 20 खाटांच्या क्षमतेचे आयसीयु बेडसचे युनिट उभारणीचे काम सुरु झाले असून 120 ऑक्सिजन पुरवठा असलेल्या खाटांचीही येथे लवकरच सुविधा सुरु होईल.

हेही वाचा: कोरोनाच्या तिस-या लाटेची तयारी; पण कंत्राटी मनुष्यबळावर मर्यादा

या व्यतिरिक्त संस्थात्मक विलगीकरण सक्तीचे झाल्यास टीसी महाविद्यालय, रयत भवन, तारांगण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातही खाटांची तयारी करण्यात आली असून लहान मुलांना यात बाधा झाली तर तारांगण वसतिगृहात त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. डॉ. सौरभ मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यवस्था उभारली जाईल.

वैद्यकीय महाविद्यालय, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय तसेच रुई ग्रामीण रुग्णालय परिसरात नव्याने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झालेले असून ऑक्सिजन बेडची कमतरता भासणार नाही, असा प्रशासनाला विश्वास वाटतो.

loading image
go to top