
बारामती-जेजुरी अंतर आता 35 मिनिटात पार करणे शक्य
बारामती - पोटातील पाणीही हलणार नाही अशा गुळगुळीत रस्त्यावरुन बारामती (Baramati) ते जेजुरी (Jejuri) हे 50 कि.मी. चे अंतर (Distance) आता अवघ्या 35 मिनिटात पार करणे शक्य होणार आहे.
हायब्रीड अँन्युईटी (हॅम) योजनेअंतर्गत जेजुरी ते नीरा नरसिंगपूर या रस्त्याचे काम सुरु आहे. या मध्ये जेजुरी ते मोरगाव हा टप्पा पूर्ण झाला असून आता मोरगाव ते का-हाटीपर्यंत रस्त्यावरील डांबरीकरणाचा अंतिम थर टाकून पूर्ण झाला आहे.
का-हाटी ते बारामतीपर्यंतचे काम येत्या पंधरवड्यात संपणार असून त्या नंतर महिन्याभरानंतर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला व मधोमध थर्मोप्लास्टचे पांढरे पट्टे आखून त्यावर कॅटआईज (रिफेल्कटर असलेले छोटे चौकोनी प्लॅस्टिकचे तुकडे) बसविले जातील. या शिवाय अवघड व तीव्र वळणावर गाडी रस्त्याच्या खाली जाऊ नये या साठी संरक्षक जाळीही उभारली जाणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही.एच. खत्री कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. यांच्या मार्फत डांबरीकरणाचे उत्तम काम सुरु असून बारामती ते जेजुरी हा प्रवास येत्या काही दिवसात कमालीचा सुखकर बनणार आहे. रात्रीच्या वेळेस अंधारामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने होणारे अपघात थर्मो प्लास्ट पट्टे आखल्यामुळे कमी होतील.
उच्च तंत्रज्ञानाचा वापर....
हा रस्ता करताना उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यात अत्याधुनिक इंपोर्टेड अशी तीन रोलर्स, एक पीटीआर पेव्हर मशीनचा वापर करुन रस्ता होत असल्याने त्याचा दर्जा उत्तम असेल.
Web Title: Baramati Jejuri Distance Can Now Be Covered In 35 Minutes
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..