चीनला टक्कर देणार बारामती, जेजुरी अन् कुरकुंभ...अशी आहे तयारी 

MIDC
MIDC

बारामती (पुणे) : कोरोनाच्या संकटाने उद्बवलेल्या परिस्थितीचा औद्योगिक क्षेत्राला विशेषतः ग्रामीण परिसरातील एमआयडीसीला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. चीनमधून स्थलांतरीत होणारे उद्योग बारामती, जेजुरी व कुरकुंभ या तीन एमआयडीसी परिसरात कसे येतील या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामीण भागातील उद्योजकांनी केली. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, जेजुरी व कुरकुंभमधील उद्योजकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, भारत फोर्जचे सुशांत पुस्तके, पियाजियोचे जगदीश गंधे, जीटीएन ईंजिनीयरींगचे मिश्रा, श्रायबर डायनामिक्सचे जितेंद्र जाधव, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, जेजुरी लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे आदी प्रमुख उद्योजक व पदाधिकारी या ऑनलाईन बैठकीमध्ये सहभागी झाले होते. 

लॉकडाउनचा उद्योग क्षेत्रावर झालेला परिणाम, परप्रांतीय कामगार यांची मानसिकता व उपलब्धता, कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंपन्या करत असलेल्या उपाययोजना, महाराष्ट्र राज्यातील जादा वीजदर, लघुउद्योगांच्या अर्थकारणावर झालेला विपरीत परिणाम याबाबत चर्चा झाली. जगातील अनेक देश चीनमधील त्यांचे प्रकल्प बंद करून भारतात स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत आहेत, असे प्रकल्प महाराष्ट्रातील बारामती, इंदापूर, फलटण, टेंभुर्णी, जेजुरी आदी ग्रामीण भागात आणण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व स्वताः सुप्रिया सुळे यांनीही प्रयत्न करावेत, असे आवाहन केले गेले. 

लघुद्योगांना त्यांनी वसूल केलेली जीएसटीची रक्कम काही कालावधीसाठी बिनव्याजी वापरण्यास मिळावी, राज्य शासनाने कर्ज हमी घेऊन लघु उद्योगांना अधिक भांडवल उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या धनंजय जामदार यांनी केल्या. बारामती, जेजुरी, कुरकुंभ एमआयडीसी मधील उद्योगांच्या मागण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com