esakal | बारामतीमधील लॉकडाउबाबत महत्वाची बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीमधील लॉकडाउबाबत महत्वाची बातमी

कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने तालुका व शहरात प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यासाठी बारामती शहर व तालुक्याचा लॉकडाऊन येत्या 20 सप्टेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

बारामतीमधील लॉकडाउबाबत महत्वाची बातमी

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने तालुका व शहरात प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यासाठी बारामती शहर व तालुक्याचा लॉकडाऊन येत्या 20 सप्टेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या दालनात आज शहरातील व्यापारी व प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रभारी पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, मुख्याधिकारी किरणराज यादव, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तहसिलदार विजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुईचे डॉ. सुनिल दराडे तसेच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर, माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर व सुनील पोटे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. 

बारामती तालुक्यातील माळेगाव, पणदरे व गुनवडी या गावातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी सोमवारी (ता. 14) होणार आहे, त्याच धर्तीवर बारामती शहरातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. बुधवार, शुक्रवार व शनिवारी शहराच्या विविध प्रभागात घरोघरी जाऊन 640 लोक ही तपासणी करणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी दिली. ही तपासणी करताना प्रत्येक घरात त्या घरातील प्रत्येक सदस्य उपस्थित असणे गरजेचे आहे, याचा विचार करता लॉकडाऊनखेरीज ही बाब शक्य होणार नाही, त्या मुळे रविवारपर्यंत लॉकडाऊन कायम असावा, अशी अपेक्षा यादव यांनी व्यक्त केली. 

दांपत्य अधिकारानुसार 'यांना' मिळणार नुकसानभरपाई; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय​

प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व प्रभारी पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनीही कोरोनाचे रुग्ण कमी होण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे, त्या मुळे आगामी आठवडा अशीच स्थिती ठेवली तर ही साखळी तोडता येईल, असे मत व्यक्त केले. रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा काही कटू निर्णय घेण्यापेक्षा आताच पुन्हा आठव़डाभर बारामती बंद ठेवल्यास त्याचा फायदा होईल, असे मत प्रशासनाने मांडल्यानंतर सर्वच व्यापा-यांनी त्याला एकमुखी पाठिंबा दिला. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, सुनील पोटे, जवाहर वाघोलीकर तसेच स्वप्नील मुथा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे होईल सर्वेक्षण....
बुधवार, शुक्रवार व शनिवार असे तीन दिवस नगरपालिका विविध वॉर्डनिहाय प्रत्येक घरात जाऊन सर्वेक्षण करणार असून ज्येष्ठ नागरिक व विविध व्याधी असलेल्या व्यक्तींची ऑक्सिजन लेव्हल व थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे. सात ठिकाणी तात्पुरते कोविड केअर सेंटर तयार केली जाणार असून संशयितांची लगेचच रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे. पॉझिटीव्ह येणा-यांना कोविड केअर सेंटरमध्ये व निगेटीव्ह येणा-यांना सात दिवस घरातच विलगीकरणात ठेवले जाणार आहे. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)