
बारामती नगरपालिका नागरिकांकडून प्लॅस्टिकचा कचरा विकत घेणार
बारामती - शहरातील प्लॅस्टिक निर्मूलनासाठी (Plastic Elimination) बारामती नगरपालिकेने (Baramati Municipal) अभिनव कल्पना शोधून काढली असून त्या मुळे प्लॅस्टिकमुक्त (Palsticfree) बारामतीच्या दिशेने वाटचाल सुरु होईल असा विश्वास नगरपालिका प्रशासनास वाटत आहे.
प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर कमी करुन लोकांना कापडी पिशव्यांची सवय लावण्यासाठी बारामती नगरपालिकेने आता प्लॅस्टिकचा कचरा थेट विकत घेण्याची योजना हाती घेतली आहे. बारामतीत पहिल्या टप्प्यात दोन ठिकाणी प्लॅस्टिकचा कचरा नगरपालिकेच्या वतीने लुको नावाची कंपनी संकलन करणार आहे.
हेही वाचा: अपात्र परीक्षार्त्यांना ठरवलं पात्र; पाहा व्हिडिओ
ज्या प्लॅस्टिकच्या कच-यावर प्रक्रीया होऊ शकते असा कचरा दहा रुपये प्रति किलो या भावाने तर ज्या कच-यावर प्रक्रीया शक्य होत नाही असा कचरा तीन रुपये प्रति किलो या भावाने विकत घेतला जाणार आहे. गणेश मार्केट व पंचायत समितीनजिक अशा दोन संकलन केंद्राच्या माध्यमातून नगरपालिका प्लॅस्टिकचा कचरा थेट विकतच घेणार आहे. बारामतीकरांनी या पुढील काळात आपल्या दैनंदिन कच-यात प्लॅस्टिक व प्लॅस्टिकसदृश कचरा टाकू नये, तो संकलन केंद्रावर देऊन किलोप्रमाणे त्याचे पैसे घेऊन जाण्याचे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या प्लॅस्टिकच्या कच-याचे वर्गीकरण न करताच त्याची विल्हेवाट लावली जात आहे, या प्लॅस्टिकमुळे नदी, कालवा गटारांमध्ये अनेकदा घाण निर्माण होते, सूक्ष्म प्लॅस्टिक प्राण्यांच्या तसेच मानवी अन्नसाखळीत प्रवेश करु पाहत असल्याने ते अधिकच धोकादायक बनले आहे, या पार्श्वभूमीवर बारामती प्लॅस्टिकमुक्तीच्या दिशेने आता नगरपालिकेने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे.
बारामतीकरांनो हे करा.....
या पुढील काळात नेहमीच्या कच-यात प्लॅस्टिक टाकू नका
प्लॅस्टिक वर्गीकरणातील प्रत्येक गोष्ट वेगळी गोळा करा
या पुढे प्लॅस्टिक आणून देणा-यांना प्रतिकिलोनुसार परतावा मिळेल
कच-यातील प्लॅस्टिक टप्याटप्याने कमी करण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे
प्लॅस्टिक फेकून न देता एकत्रित संकलित करुन ते नगरपालिकेकडे द्यावे
Web Title: Baramati Municipal Plastic Waste Buying By Citizens
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..