
बारामती : संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी बारामती नगरपालिकेने जय्यत तयारी केल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. नगरपालिकेसमोर शारदा प्रांगणात पालखीसोहळा विसावणार असून त्या साठी भव्य शामियाना मंडप उभारणी करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तसेच मार्केट यार्डमध्ये वारक-यांच्या आंघोळीची तसेच महिला व पुरुषांच्या स्वतंत्र शॉवरची सोय करण्यात आली आहे. वारक-यांच्या सोयीसाठी वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार असून नगरपालिका हद्दीतील रस्त्यांचे डांबरीकरण व खड्डे बुजविण्यात आले आहेत. रस्त्यांची व परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. पालखीला अडथळा होणा-या झाडांच्या फांद्या काढून टाकण्यात आल्या आहेत.
निर्मल वारी अंतर्गत तेरा ठिकाणी 800 सीटसच्या मोबाईल शौचालयांची सोय करण्यात आली आहे. तेथे लाईट व पाण्याचीही सोय करण्यात आली आहे. पालखी मार्गावरील बांधकामाचा राडारोडा, खडी, वाळू, माती व साईडपट्टया साफ करुन घेण्यात आल्या आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करुन औषध व धूरफवारणीही केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अंतर्गत पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिकमुक्त, प्रदूषणमुक्त तसेच पर्यावरण हरित संतुलनासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणेच पालखी सोहळ्याच्या पाठीमागे बारामती नगरपालिकेचे स्वच्छतादूत स्वच्छता करीत येणार आहेत. चहाचे ग्लास, फळांच्या सालींसह रस्त्यावरील कचरा त्वरेने उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 150 स्वच्छतादूत हे काम करणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी होणार आहेत. मोबाईल शौचालय व आंघोळीसाठी रस्ता दाखविण्याचेही काम विद्यार्थी करणार आहेत.