बारामतीकरांनो चिंता नको! घरपोच मटण मिळण्याचा मार्ग मोकळा

मिलिंद संगई
Saturday, 18 July 2020

लॉकडाऊनमुळे मांसाहारी लोकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने आज प्रशासनाने मटण, मासे, चिकन, अंडी यांची घरपोच सेवा देण्याच्या अटीवर विक्री करण्यास परवानगी दिली.

बारामती, ता. 18- श्रावण सुरु होण्यास दोनच दिवस उरलेले त्यात लॉकडाऊनचे संकट....बारामतीतील मांसाहारी खवैय्यांपुढे पडलेला प्रश्न आज अजित पवार यांनीच निकाली काढला. लॉकडाऊनमुळे मांसाहारी लोकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने आज प्रशासनाने मटण, मासे, चिकन, अंडी यांची घरपोच सेवा देण्याच्या अटीवर विक्री करण्यास परवानगी दिली. 

21 जुलैपासून श्रावण महिना सुरु होतो, त्या मुळे त्या पूर्वीचे दोन दिवस मांसाहारी लोक आपल्या जिभेचे चोचले पुरवून घेतात. यंदा नेमका लॉकडाऊन आल्याने सर्वच दुकाने बंद होती. अशा स्थितीत मटण, मासे, चिकन व अंडी विक्रेत्यांच्या व्यवसायावर तर विपरीत परिणाम झालाच होता पण खवैय्यांचीही पंचाईत झाली होती. 

आणखी वाचा - समन्वय साधता येत नसेल तर, वेगळा विचार करू : अजित पवार

आज या संदर्भात प्रवीण दत्तात्रय गालिंदे व पार्थ प्रवीण गालिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र दिले होते. या पत्राचा सहानुभूतीने विचार करुन पवार यांनी प्रशासनास दोन दिवस घरपोच सेवा देण्याच्या अटीवर विक्रीस परवानगी देण्याच्या सूचना दिल्या. त्या नुसार उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी या संदर्भात आदेश काढून सर्व नियमांचे पालन करुन घरपोच सेवा देत मटण, चिकन, अंडी व मासे विक्रीस दोन दिवसांपुरती परवानगी दिली आहे. 

लॉकडाउनमधील पहिला टप्पा शनिवारी रात्री बारा वाजता संपेल. दुसरा टप्पा रविवारपासून (ता. 19 जुलै) सुरू होणार आहे. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार रविवारपासून 23 जुलैपर्यंत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी ठोक व किरकोळ दुकाने (किराणाभुसार मालाची) तसेच आडते भाजी मार्केट, फळ बाजार, भाजी मार्केट रविवारपासून सकाळी 8 ते दुपारी 12 दरम्यान उघडी राहणार आहेत, असे म्हटले होते. मात्र त्या आदेशात सुधारणा करण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गर्दी होईल हे लक्षात घेऊन आयुक्त विक्रमकुमार यांनी सुधारित आदेश काढून फक्त रविवारी (ता. 19) दुकाने सायंकाळी 6 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. 20, 21, 22, 23 जुलै रोजी ही दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 दरम्यानच उघडी राहणार आहेत. ई-कॉमर्सलाही यात समाविष्ट करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baramati mutton shop have permission only for parcel