esakal | समन्वय ठेवता येत नसेल तर वेगळा विचार करु - अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

कोरोनाच्या रुग्णांबाबत समन्वय ठेवता येत नसेल तर वेगळा विचार करावा लागेल, असा थेट इशारा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

समन्वय ठेवता येत नसेल तर वेगळा विचार करु - अजित पवार

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती, ता. 18- कोरोनाच्या रुग्णांबाबत समन्वय ठेवता येत नसेल तर वेगळा विचार करावा लागेल, असा थेट इशारा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील शासकीय वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना दिला. कोरोनाच्या बाबतीत बारामतीतील शासकीय विभागातील डॉक्टरांचा अजिबात समन्वय नाही, स्वताः उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याची थेट तक्रार नगरसेवक किरण गुजर यांनी आज बारामतीत पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली. पुण्यातील बेडची संख्या आता पुण्यातीलच रुग्णांना पुरत नाही त्या मुळे बारामतीत समन्वयाच्या सूचना देताना अजित पवार यांनी आज निर्वाणीचा इशाराच दिला. 

आज निश्चित झालेल्या सूत्रानुसार आता बारामती शहरातील लक्षणे असलेला रुग्ण सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात तर ग्रामीण भागातील रुग्ण रुई येथील रुग्णालयात दाखल केला जाईल. डॉक्टरांच्या तपासणीनंतर रुई येथे स्वॅब घेतले जातील. ज्यांचे स्वॅब घेतले जातील त्यांचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांना मेडीकल कॉलेजमध्येच थांबावे लागणार आहे. 

हे वाचा - लाॅकडाउनमध्ये रविवारपासून पुणेकरांना दिलासा

ज्या रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येथील व ज्यांना लक्षणे नसतील त्या शहरी भागातील रुग्णांना सिल्व्हर ज्युबिली व ग्रामीण भागातील रुग्णांना रुई रुग्णालयात दाखल केले जाईल. ज्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह येथील त्यांनाही हमीपत्र लिहून दयावे लागणार असून त्यांनाही सात दिवस घरातच विलगीकरणात राहावे लागणार आहे. 

बारामती हॉस्पिटल ताब्यात घेण्याचे आदेश
रुग्णांची संख्या वाढेल असे गृहीत धरुन ऑक्सिजन व व्हेंटीलेटर्सची सुविधा असलेले बारामती हॉस्पिटल ताब्यात घेण्याचे आदेशच आज अजित पवार यांनी जिल्हाधिका-यांना दिले. ज्यांना व्हेंटीलेटर्सची गरज पडेल त्यांना येथे हलविण्याची योजना आहे. 

हे वाचा - दौंडमध्ये बॅंकेच्या कर्मचाऱ्यास कोरोना...प्रशासनाने घेतला हा निर्णय

डॉ. तांबे यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी
दरम्यान रुईचे डॉ.सुनील दराडे, सिल्व्हर ज्युबिलीचे डॉ.सदानंद काळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांचे समन्वयन वैद्कीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे करणार आहेत. दरम्यान अलजुमॅब व टोसिलीझाम्बा ही दोन इंजेक्शन्सचा साठा बारामतीत तातडीने करुन ठेवण्याचे निर्देश पवार यांनी दिले आहेत. 

दरम्यान ज्या डॉक्टरांनी सलगपणे काही दिवस सेवा दिली आहे, त्यांना काही काळ विश्रांती देऊन त्यांच्या जागी नवीन डॉक्टरांची नेमणूक करणे, शासकीय डॉक्टरांची संख्या अपुरी असल्यास खाजगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत करणे असेही उपाय अंमलबजावणी करण्याचेही निर्देश पवार यांनी या वेळी दिले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णांच्या निवासाची व्यवस्था
दरम्यान माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे वसतिगृह तसेच समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात गरज पडल्यास रुग्णांची सोय करण्याचेही आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. 

अंत्यसंस्काराचीही वेगळी व्यवस्था
कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरी वस्तीपासून दूर अंतरावरची जागा शोधून तेथे तात्पुरत्या स्वरुपात स्मशानभूमीची निर्मिती करण्याचेही आज निश्चित झाले असून बारामती नगरपालिका येथे स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करुन देणार आहे. 

हे वाचा - इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँण्ड सायन्स ला 'स्वायत्त महाविद्यालया'चा दर्जा

पणदरे येथील महिलेचा कोरोनाने मृत्यू
तालुक्यातील पणदरे येथील एका 55 वर्षीय महिलेचा आज रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये श्वसनाचा त्रास होत असताना मृत्यू झाला. या मुळे आता बारामती तालुक्यात कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या पाच झाली आहे. 

बारामतीकरांसाठी परखड भूमिका घेतली
दरम्यान कोरोनाबाबत आरोग्य विभागात समन्वय नसल्याने आज परखड भूमिका घ्यावी लागली व उपमुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती विशद करावी लागली, असे किरण गुजर यांनी स्पष्ट केले. अधिका-यांचा रोष पत्करुन बारामतीकरांसाठी ही भूमिका घेतल्याचे ते म्हणाले.