Pune बारामतीत अश्लिल ऑडियो क्लिपमुळे पुन्हा खळबळ... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

audio clip viral

Pune : बारामतीत अश्लिल ऑडियो क्लिपमुळे पुन्हा खळबळ...

बारामती : बारामती येथील नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कंत्राटी पर्यवेक्षक व कर्मचारी यांच्यातील कथित अश्लिल संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बारामती नगरपालिकेच्या स्वच्छतेचे कंत्राट एका खाजगी कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. या कंपनीतील एक पर्यवेक्षक त्याच्या एका कर्मचा-याशी बोलताना स्वच्छतेसाठी येणा-या विशिष्ट महिलांबाबत अश्लिल संभाषण करत संबंधित महिलेकडून शरीरसुखाची अपेक्षा थेटपणे करताना स्पष्ट होत आहे.

या संभाषणातील काही शब्द अत्यंत खालच्या पातळीवरील असून या दोन्ही कर्मचा-यांची भाषा ही महिलांच्या दृष्टीने लज्जास्पद अशीच आहे. दरम्यान या ऑडिओ क्लिपबाबतची माहिती व्हायरल झाल्यानंतर मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी या दोन्ही कर्मचा-यांना कामावर येण्याची बंदी केलेली असून मुख्य कंत्राटदाराकडून या बाबत खुलासा मागविला आहे.

या संभाषणामध्ये काही महिलांची नावेही संबंधितांनी घेतली असून त्यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीत हे दोघेही बोलत असून या दोघांवरही कारवाईची मागणी आता जोर धरु लागली आहे. अशा पध्दतीने महिलांविषयी जर कंत्राटदाराकडील पुरुष कर्मचारी विचार करत असतील तर महिलांसाठी हे काम खऱच कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी स्पष्ट केले आहे.