esakal | बारामतीत पॉवर पेट्रोलचं शतक; उच्चांकी इंधनदराची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

petrol disel price hike

गेल्या दोन आठवड्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत असून दर भडकले आहेत. देशात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे.

बारामतीत पॉवर पेट्रोलचं शतक; उच्चांकी इंधनदराची नोंद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बारामती - गेल्या दोन आठवड्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत असून दर भडकले आहेत. देशात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. राज्यातही काही ठिकाणी 100 रुपयांपर्यंत पेट्रोलचे दर पोहोचले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने आज बारामतीत नवीन विक्रम प्रस्थापित केला. आजवरच्या इतिहासातील उच्चांकी इंधनदराची आज बारामतीत नोंद झाली. पॉवर पेट्रोलचा आजचा दर शंभरी पार करुन गेला. 

बारामतीतील पेट्रोलपंपावर साधे पेट्रोल 97 रुपये 19 पैसे तर पॉवर पेट्रोल 100 रुपये 98 पैसे दराने विकले गेले. 86 रुपये 91 पैशांनी आज डिझेलची विक्री केली गेली. बारामतीच्या इतिहासातील हा उच्चांकी दर असल्याचे पेट्रोलपंप चालकांनी सांगितले. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

इंधन दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडत असताना दररोज पेट्रोलचे दर वाढतच असल्याने लोक हैराण झाले आहेत. इंधन दरवाढीचा परिणाम सर्वच बाबींचे भाव वाढण्यात होणार असल्याने महागाईलाही या निमित्ताने चालना मिळणार आहे. बारामती शहर व तालुक्यातील पंपावर आज विक्रमी दराने पेट्रोलची विक्री झाली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शहरातील रस्त्यांवरील वाहतूक मंदावली होती, सोमवार असूनही आज वर्दळ तुरळकच होती, त्या मुळे पेट्रोलपंपावरही वाहनांची तुलनेने गर्दी कमी होती. 

इंधन दरवाढीचा फटका सामान्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बसणार आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई कमालीची वाढणार असून सर्वच वस्तूंच्या दरात वाढ होणार आहे. केंद्राने दरवाढ नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.
– संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

हे वाचा - पुणे : साखरपुड्यात राडा; जेवणावरून झालेला वाद तिघांच्या जीवावर बेतला

जगायचे कसे हेच समजेना
एकीकडे कोरोनामुळे अगोदरच आर्थिक अडचणींचा सामना करतो आहे, दुसरीकडे इंधन दरवाढीचा फटका बसतोय. महागाई गगनाला भिडू पाहत असल्याने जगायचे कसे हेच समजेनासे झाले आहे. सरकारने लोकांना दिलासा द्यायला हवा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.