पोलिसांची ग्रामीण भागातही धडक कारवाई; विना मास्क फिरणाऱ्यांना ठोठावला दंड

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

शहराबरोबरच ग्रामीण भागातही विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईला सुरवात केली आहे.

शिर्सुफळ (पुणे) : कोरोनामुक्त झालेल्या बारामती शहरासह ग्रामीण भागात पुन्हा नव्याने कोरोनाने डोके वर काढलेले आहे. त्यामुळे आपल्याला काहीही धोका नाही, अशा भ्रमात विना मास्क फिरणाऱ्या ४१ जणांना कटफळ ग्रामपंचायत आणि बारामती तालुका पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत प्रत्येकी दोनशे रुपये दंडाची आकारणी केली. यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातही विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईला सुरवात केली आहे.

- कोरोनामुळे 'ड्रॅगन' खातेय भाव...

यापूर्वी फक्त बारामती शहरात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. मात्र, कोरोनाचा वाढता आलेख पाहता तालुक्याच्या ग्रामीण भागातही काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली कटफळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक महेंद्र बेंगारे, ग्रामपंचायत कर्मचारी जहांगीर तांबोळी, सागर खोमणे यांच्यासह तालुका पोलिस स्टेशनचे हवालदार भाऊसो पलंगे, राजेंद्र काळे, दत्तात्रय मदने, गणेश हिवरकर यांनी विविध ठिकाणी जोरदार कारवाई करत विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

लॉकडाऊनमधील लग्नाचा नवीन ट्रेंड; नवरा-नवरीला मिळतोय मॅचिंग मास्क

कारवाई या पुढेही सुरु राहणार
बारामतीचे अप्पर पोलिस अधिकारी मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या ग्रामीण भागातही नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच अनेकजण बिनधास्त विना मास्क दुचाकीवरुन गावभर हिंडताना दिसतात, अशा नागरिकांवर आता दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. भविष्यात त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात येतील. यामुळे सर्वांनी नियमांचे पालक करावे, असे आवाहन पोलिस हवालदार भाऊसाहेब पलंगे यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati police has taken punitive action against 41 people who were walking without masks