लॉकडाऊनमधील लग्नाचा नवीन ट्रेंड; नवरा-नवरीला मिळतोय मॅचिंग मास्क

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

नवरा-नवरीला मॅचिंग मास्क 
वऱ्हाडी मंडळीत नवरा-नवरी उठून दिसावीत, तसेच त्यांच्या कपड्यांना साजेसे असे मास्क असावेत म्हणून आता लग्नाच्या ड्रेसमधील पीसपासून किंवा कपड्यांना मॅचिंग असणारा मास्क बनवण्यात येत आहे. त्यामुळे लग्नात सगळं कसं मॅचिंग हवं, हा अट्टहास आता मास्कलादेखील लागू झाला आहे.

पुणे - हॉल किंवा मांडवात चांगले डेकोरेशन, जेवणासाठी स्वादिष्ट पदार्थ, दोन्ही पक्षांकडील मंडळींची चांगली व्यवस्था आणि हार अशा अनेक गोष्टी लग्नाच्या पॅकेजमध्ये हव्या असतात, त्यात आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे, ती म्हणजे मास्कची.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लग्नावेळी जमलेल्या मंडळींना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आता टोपी-टॉवेल किंवा फेट्याप्रमाणे मास्कही दिले जात आहेत. लॉकडाउनकाळात होत असलेल्या अनेक लग्नांमध्ये हा ट्रेंड पाहायला मिळत आहे. लग्नासाठी आवश्‍यक असलेल्या बाबींचे नियोजन हॉल चालकाकडे दिलेले असेल, तर त्याने मास्कदेखील पुरवावेत, असा आग्रह लग्नघरातील मंडळी करत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लग्नाच्या पॅकेजमध्ये समाविष्ट झालेल्या मास्कसाठी वेगळे पैसे आकारण्यात येत आहेत. याबाबत नुकत्याच झालेल्या एका लग्नघरातील नितीन खिलारी यांनी सांगितले, की शहरातील एका हॉलमध्ये ठरावीक लोकांच्या उपस्थितीत माझ्या पुतण्याचे २६ जूनला लग्न झाले. त्यासाठी आम्ही घेतलेल्या लग्नाच्या पॅकेजमध्ये मास्कदेखील होते. फेटा किंवा टोपी-टॉवेल दिल्यानंतर त्याचा फक्त त्याच दिवशी उपयोग होतो. नंतर ते घरातच पडून असतात. त्यापेक्षा मास्क दिल्याने किमान त्यांचा आरोग्याच्या दृष्टीने चांगला वापर तरी होत आहे.

बाहेर जाऊन येते, असं सांगून गेल्यात तीन तरुणी...चार दिवसांपासून पोलिस...

तसेच, त्या गोष्टींच्या तुलनेत मास्कसाठी पैसेदेखील कमी लागतात. मास्क आता जीवनावश्‍यकच झाल्याने वऱ्हाडी मंडळींना इतर बाबी देण्यापेक्षा मास्क दिलेले कधीही चांगले. ‘लग्नाच्या बदललेल्या पॅकेजबाबत हॉलचालक नितीन पांडे म्हणाले, ‘‘सध्या हौसेच्या वस्तूंपेक्षा आवश्‍यक असलेल्या बाबींची मागणी होत आहे. लग्नात चांगल्या व्यवस्थेसह चांगल्या दर्जाचे मास्क पुरविण्याची मागणी नागरिक करीत आहेत, त्यामुळे मागणी असेल त्याप्रमाणे आम्हीदेखील मास्क उपलब्ध करून देत आहोत. तर, काही लोक स्वतःच मास्क घेऊन येतात व त्यांचे वाटप करतात.’’

राज्यातील महाविद्यालयांची माहिती 'ऑनलाइन' उपलब्ध व्हावी; शिक्षणमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?

लग्नापूर्वी संपूर्ण हॉल सॅनिटाइज करून द्या, अशीदेखील मागणी आता होत आहे. आमचे कर्मचारी आणि लग्नाला आलेली मंडळी यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने सॅनिटायझेशन करणे गरजेचेदेखील आहे, त्यामुळे लग्नाच्या दिवशी हॉल आणि लग्नाला येणाऱ्या मंडळींचेदेखील सॅनिटायझेन करून देण्यात येते, असे पांडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New trends in weddings taking place during lockdown