बारामतीत पोलिस तयार करणार आरोपींची कुंडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत पोलिस तयार करणार आरोपींची कुंडली

बारामतीत पोलिस तयार करणार आरोपींची कुंडली

बारामती : या पुढील काळात ज्यांच्याविरुध्द दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपींनी पुन्हा गुन्हा केला तर त्यांच्याविरुध्द झोपडपट्टी दादा कायदा किंवा मोक्काअंतर्गत थेट कारवाईचा इशारा पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांनी दिला आहे.

हेही वाचा: ..त्यापेक्षा विक्रम गोखलेंनी राजकीय पक्षात प्रवेश करावा- पृथ्वीराज चव्हाण

सुनील महाडीक यांनी नुकताच बारामती शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षकपदाचा कार्यभार स्विकारला आहे. हा कार्यभार स्विकारल्यानंतर बारामती शहराची कायदा व सुव्यवस्था अधिक चांगली असावी या साठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी बारामतीत कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी वाढणार नाही या साठी नियोजन सुरु केले आहे.

बारामती शहर पोलिस ठाण्यात पोलिसांनी ज्यांच्याविरुध्द गंभीर स्वरुपाचे दोन गुन्हे दाखल आहेत, अशांची यादी तयार केलेली आहे. या पुढील काळात कोणत्याही स्वरुपाच्या गुन्ह्यात अशा आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला तर त्यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत महाडीक यांनी दिले आहेत.

बारामती हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मतदारसंघ असून त्यांचे बारकाईने बारामतीवर लक्ष असते. कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत ते कमालीचे संवेदनशील आहेत, त्या पार्श्वभूमीवर पोलिस निरिक्षकांनीही काम सुरु केले असून त्यांनी गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. बारामतीच्या शांततेला बाधा आणण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचे महाडीक यांनी स्पष्ट केले आहे.

दोनहून अधिक गुन्ह्यात सहभागी असलेल्यांचा या पुढे कोणत्याही गुन्ह्यात सहभाग आढळल्यास झोपडपट्टी दादा कायदा किंवा मोक्काअंतर्गत कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. पूर्वीचे गुन्हेगारी स्वरुपाचे रेकॉर्ड असलेल्या आरोपीसोबत नवीन आरोपींनी गुन्हा केला तर त्याच्यावरही त्याच कायद्यान्वये कारवाई होईल, त्या मुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींसमवेत कोणतेही कृत्य करताना युवकांनी भविष्याचा विचार करावा असे आवाहन सुनील महाडीक यांनी केले आहे.

loading image
go to top