esakal | बारामती पोलिसांनी पकडला अडीच लाखांचा गुटखा
sakal

बोलून बातमी शोधा

crime

बारामती पोलिसांनी पकडला अडीच लाखांचा गुटखा

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : एकीकडे शहरात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना दुसरीकडे अवैध व्यवसाय करणा-यांना त्याची कसलीच चिंता नाही. बारामती शहर पोलिसांनी आज गुनवडी हद्दीत छापा टाकून दोन लाख 37 हजारांचा गुटखा जप्त केला. शहर पोलिसांनी आज पिंपळी ते जळोची मार्केट यार्ड रस्त्यावर गुनवडी (ता. बारामती) गावच्या हद्दीत एका घरावर छापा टाकून 2 लाख 37 हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. याप्रकरणी संग्राम रामेश्वर देवकाते (वय 29, रा. गिरीजानगर, गुनवडी) याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

पोलिस कर्मचारी जितेंद्र शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली. शनिवारी (ता. 17) रोजी ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश दंडीले, महिला पोलिस नाईक माया निगडे, जितेंद्र शिंदे हे संचारबंदीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना दंडीले यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार सरकारी पंच तयार करत पंचांसमक्ष देवकाते याच्या घरी छापा टाकण्यात आला. यावेळी भिंतीलगत चार पोत्यांमध्ये गुटखा भरल्याचे आढळले.

पोलिसांनी ती ताब्यात घेत उघडून पाहिली असता त्यात 2 लाख 37 हजार रुपयांचा साधारणतः 50 ते 60 किलो गुटखा मिळून आला. राज्यात गुटखा बंदीचा आदेश असताना तो विक्री करण्याच्या उद्देशाने देवकाते याने घरी ठेवला होता. त्याच्या विरोधात पोलिसांनी भादंवि कलम 328, 272, 273 सह अन्न सुरक्षा व मुंबई कायदा नियम व नियमनानुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

हेही वाचा: पुण्याहून साता-याला निघालात, थांबा! खंबाटकी घाटात झालाय माेठा अपघात