लता करे यांच्या जीवनावर चित्रपट

मिलिंद संगई
बुधवार, 7 जून 2017

पतीच्या उपचारासाठी अनवाणी धावून जिंकली होती मॅरेथॉन स्पर्धा
बारामती - पतीवरील उपचाराच्या खर्चासाठी अनवाणी पायाने धावून बारामतीतील शरद मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्यानंतर लता करे या केवळ राज्यच नाही, तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीच्या झोतात आल्या. माध्यमांनी दखल घेतल्यानंतर त्यांना मदतही मिळाली. आता मात्र त्या वेगळ्या कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ते म्हणजे त्यांच्यावर मराठीत एक चित्रपट येऊ घातला आहे. 

मनात जिद्द असेल आणि ध्येय प्राप्त करण्याची आंतरिक उर्मी असेल तर तेथे वयही आडवे येत नाही, याचा प्रत्यय बारामतीच्या लता करे (वय ६५) यांच्याकडे पाहिल्यानंतर येतो. एका अशिक्षित पण जिद्दी महिलेची कथा या चित्रपटातून सादर होणार असून विशेष म्हणजे लता करे याच या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतील. 

हैदराबाद येथील पतनज्योती क्रिएशन्स ही संस्था लता करे यांच्यावरील दोन तास लांबीच्या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटांचे बारा दिवसांचे चित्रीकरण बारामतीनजिकच्या लोकेशनवर पूर्ण झाले आहे, अशी माहिती या चित्रपटाचे दिग्दर्शक नवीन देशबोईना यांनी दिली.

लता करे यांचे पती भगवान व मुलगा सुनील हे दोघेही चित्रपटात झळकणार आहेत. राधा चव्हाण त्यांच्या सूनबाईंच्या भूमिकेत दिसतील. हैदराबादच्या इनाडू वृत्तपत्रात सुमारे दीड वर्षापूर्वी लता करे यांची बातमी वाचून पतनज्योती क्रिएशन्सची टीम बारामतीत आली होती. त्यांनी त्याच वेळी लता करे यांच्यावर चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. 

सध्या पंकज यादव, अजय शिंदे, रेखा गायकवाड, आदित्य सनगरे आदींची टीम निर्मितीत व्यग्र आहे. लता करे यांच्या जिद्दीचा हा जीवनपट असून त्या स्वतःच या चित्रपटात झळकणार असल्याने चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. 

इथेही जिद्दीचे दर्शन...
आजही मोलमजुरी करणाऱ्या लता करे यांना अभिनयाचा गंधही नाही, परंतु येथेही त्यांचा जिद्दी स्वभाव त्यांच्या मदतीला धावून आला. जिद्दीने त्या सगळेच आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Web Title: baramati pune news movie on lata kare life