
बारामती तालुका पोलिसांनी धमाकेबाज कामगिरी करीत आज दोन गावठी पिस्तूल, एक रिव्हॉल्वर व जिवंत काडतुस जप्त केले.
बारामती तालुका पोलिसांची कामगिरी; दोन गावठी पिस्तूल, एक रिव्हॉल्वर जप्त
माळेगाव - बारामती तालुका पोलिसांनी धमाकेबाज कामगिरी करीत आज दोन गावठी पिस्तूल, एक रिव्हॉल्वर व जिवंत काडतुस जप्त केले. तसेच एका व्यक्तीला या प्रकरणी गुन्हा दाखल करीत जेरबंद केले. अमित तानाजी शेंडगे (वय 20, रा. उस्मानाबाद. सध्या रा. रुई, ता.बारामती) हे वरील प्रकरणातील सराईत गुन्हेगाराचे नाव आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.
बारामती औद्योगिक विभाग परिसरामध्ये सदरची व्यक्ती वरील मुद्देमाल विक्रीसाठी घेऊन आला होता. या बाबत अधिकारी श्री. ढवाण म्हणाले, 'बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत मोठमोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. तेथे होणाऱ्या चोऱ्यांना नुकताच तालुका पोलिसांनी आळा घातला आहे. त्या कामाचाच भाग म्हणून पोलीस परिसरात ग्रस्त घालत असताना आज अमित शेंडगे हा व्यक्ती दोन गावठी बनावटी पिस्टल व एक रिव्हॉल्वर, तसेच जिवंत काडतुस विक्रीसाठी घेऊन आल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ औद्योगिक परिसरात पोलिस पथकाने सापळा लावला.
पोलिसांची चाहूल लागल्याने सदर इसम सैरावैरा पळू लागला, त्यास मोठ्या शीताफिने पथकाने ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली. त्याच्याकडे घातक शस्त्र मिळून आली. विशेष म्हणजे वरील आरोपी शेंडगे याच्या विरुद्ध बारामती तालुका व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्हे दाखल आहेत.'
दरम्यान, बारामती औद्योगिक परिसरामध्ये केलेल्या कारवाईत पोलीस अंमलदार राम कानगुडे, पोलीस नाईक अमोल नरुटे, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मदने इत्यादी कर्मचाऱ्यांची भूमिका निर्णायक ठरल्याचे सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी वरील यशस्वी कामगिरीबद्दल तालुका पोलिसांचे अभिनंदन केले.
Web Title: Baramati Taluka Police Two Pistols One Revolver Seized Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..