esakal | पथारी व्यावसायिक झाले भ्रमनिरास

बोलून बातमी शोधा

Bedding Professional
पथारी व्यावसायिक झाले भ्रमनिरास
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने विविध निर्बंध लागू केले आहेत. या काळात पथारी व्यावसायिकांना एक हजार ५०० रुपयांचे अनुदान देण्याची घोषणाही केली. मात्र, याबाबतचे आदेश काढताना सरकारने हात आखडता घेतल्याचे समोर आले आहे. पीएम स्वनिधी कर्ज योजनेचा ज्यांनी लाभ घेतला आहे, अशा पथारी व्यावसायिकांनाच ही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील केवळ चार हजार पथारी व्यावसायिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

राज्य सराकरने १४ एप्रिलपासून पुन्हा विविध निर्बंध लागू केले आहेत. या कालवधीत पथारी व्यावसायिकांचे नुकसान होऊ नये; म्हणून त्यांना एक हजार ५०० रुपये अनुदान देण्याची घोषणा सरकारने काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र, याबाबतचे आदेश न निघाल्यामुळे पथारी व्यावसायिकांना अद्यापही मदत मिळू शकली नव्हती. दरम्यान, सरकारच्या नगरविकास विभागाकडून यासंदर्भातील आदेश आज काढण्यात आले आहे.

हेही वाचा: पुणे रेल्वे स्थानकावर ३१ मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट बंद

मात्र, सरसकट पथारी व्यावसायिकांना या योजनेचा लाभ होईल यांची दक्षता घेण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.

नगरविकास खात्याचे उपसचिव शंकर जाधव यांनी याबाबतचे आदेश काढले असून ज्या पथारी व्यावसायिकांनी पीएम स्वनिधी कर्ज योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांनाच हे अनुदान देण्यात यावे, असे नमूद केले आहे. त्यानुसार शहरातील केवळ चार हजार पथारी व्यावसायिकांना हे अनुदान प्राप्त होणार आहे.

राज्य सरकारने पथारी व्यावसायिकांना सरसकट अनुदान देणे अपेक्षित होते. मात्र, पीएम स्वनिधी कर्ज योजनेचा लाभ घेतलेल्यांना हे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे अनेक पथारी व्यावसायिकांचा भ्रमनिरास झाला आहे. शहरातील सर्व पथारी व्यावसायिकांनी हे अनुदान मिळण्यात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

- संजय शंके, कार्याध्यक्ष, जाणीव हातगाडी, फेरी, पथारी, स्टॉलधारक संघटना