आपटाळे - शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या शिवभक्तांवर मधमाश्यांनी पुन्हा एकदा हल्ला चढविल्याची घटना रविवारी (ता. २०) सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली.
शिवनेरीवर गेल्या दोन महिन्यातील मधमाशांच्या हल्ल्याची ही चौथी घटना असल्याने शिवभक्तामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात जवळपास आठ ते दहा शिवभक्त जखमी झाले.
शिवनेरीवर विविध ठिकाणी झाडांवर तसेच कड्या कपाऱ्यांमध्ये मोठ्या आकाराची मधमाश्यांची पोळी आहेत. सध्या दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालल्यामुळे मधमाशा शिवनेरी परिसरात घोंगवण्याचे प्रमाण वाढले आहे.
दरम्यान, शिवाई देवी मंदिर परिसरात असलेल्या मधमाशांच्या पोळ्यातील मधमाश्यांनी गडाच्या पहिल्या दरवाजापाशी शिवभक्त आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात जवळपास आठ ते दहा शिवभक्त जखमी झाले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले.
दरम्यान, घटना घडल्यानंतर गडावरील परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी गडावर प्रवेश बंद करण्यात आला होता. मात्र गडावर असलेली परिस्थिती वनविभागाचे कर्मचारी आलेल्या शिवभक्तांना समजवून सांगत असतानाच काही सुशिक्षित व जबाबदार नागरिक गडावर सोडण्याचा आग्रह धरत होते. जबाबदार नागरिकांनी अशा प्रकारे वागल्यास समाजातील इतर घटकांनी कोणता आदर्श घ्यायचा असा प्रश्न निर्माण होत आहे.
दोन महिन्यातील घटना
१) दोन महिन्यापूर्वी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांची सभा संपल्या नंतर अवघ्या काही वेळातच मधमाश्यांनी शिवभक्तांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेत १० शिवभक्त जखमी झाले होते.
२) रविवार (ता. १६ मार्च) रोजी झालेल्या हल्ल्यात ४० शिवभक्त जखमी
३) सोमवार (ता. १७ मार्च) तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंती साठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांचे भाषण शिवकुंजमध्ये सुरू असताना दुसरीकडे मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात २० शिवभक्त जखमी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.