
भटक्या प्राण्यांच्या सेवार्थ बेहेनजींना हवीय मदत
खडकी - भटक्या प्राण्यांवर (Animal) दया (Love) करणाऱ्या समाजात अनेक व्यक्ती आहेत, त्यातीलच एक बेहेनजी. (Behenji) अमरजीतकौर हरिदास वेलंगनी ऊर्फ बेहेनजी गेली चाळीस वर्षे मुळा रस्ता, खडकी परिसरातील भटक्या प्राण्यांची निःस्वार्थ सेवा (Service) करत आहेत. जवळपास ४० भटकी कुत्री, मांजरांना स्वखर्चाने घरी शिजवलेले अन्न त्या स्वतःच्या हाताने खायला (Food) घालतात. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करतात; मात्र आता वयोमानामुळे व आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सेवेत खंड पडू नये म्हणून परिसरातील नागरिकांकडे मदतीची याचना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
जखमी, आजारी कुत्री, मांजरीवर कर्ज काढून औषध पाणी करावे लागते. आजारी प्राण्यांना औंध येथील प्राण्यांच्या सरकारी दवाखान्यात नेण्यासाठी प्रवास खर्च लागतो. शिवाय सरकारी दवाखान्यात बाहेरची औषधे लिहून देतात. ती औषधे घेण्यासाठी बेहेनजीकडे पुरेसे पैसे नाहीत, त्यामुळे परिसरातील काही प्राणीप्रेमी थोडीफार मदत करतात. मात्र त्यात या प्राण्यांचे भागात नाही, असे बेहेनजींचे म्हणणे आहे. त्यामुळे प्राणीप्रेमी किंवा प्राणीप्रेमी संस्थांनी अन्न-औषध, पाण्याची मदत करावी, अशी मागणी त्यांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून केली आहे.
त्या म्हणाल्या की मला लहानपणापासून प्राण्यांची आवड होती. लग्नानंतर नवऱ्यानेही मला कधी रोकले नाही. मुलांनीही मला साथ दिली. परिसरातील नागरिकांनादेखील प्राण्यांची सेवा करण्याची सवय झाली आहे. या प्राण्यांसाठी दररोज सकाळ-संध्याकाळ शिजवलेला भात व मटण मी खायला देते. दररोजचा खर्च ४०० ते ५०० रुपये आहे. पती होते तोपर्यंत मला पैशांची अडचण नव्हती. आता माझा मुलगा जमेल तसे पैसे देतो. मात्र प्राण्यांना ते पुरेसे होत नाहीत, याची खंत वाटते. मी दिसले की सगळे प्राणी माझ्या भोवती गोळा होतात. त्यांचे प्रेम बघून मला खूप बरे वाटते.
मी गेली तीस वर्षे बेहेनजींचा प्राण्यांप्रती सेवाभाव बघत आलो आहे. शांतपणे घरून शिजवून आणलेले अन्न वस्तीच्या बाहेर नेऊन प्रत्येकाला खाऊ घालणे हा बेहेनजींचा दिनक्रम. लॉकडाउनमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली; मात्र तरीही ह्याच्या-त्याच्याकडे मागून या भटक्या प्राण्यांची अविरत सेवा करताना बेहेनजी दिसतात. आम्हालाही तिच्या या सेवाभावी वृत्तीचे कौतुक आहे. आम्हाला जमेल तशी मदत करतोच; ‘एनजीओ’नी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- रवी पिल्ले, रहिवासी, मुळा रस्ता
(मदतीसाठी संपर्क - ९६६५५७०३९७)
Web Title: Behenji Needs Economic Help For Stray Animals
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..