esakal | गणेशोत्सव2019 : ‘पीएमपी’च्या लाखभर प्रवाशांना फटका
sakal

बोलून बातमी शोधा

pmpbus

 शिवाजी रस्त्यावर बेलबाग ते फडगेट चौक वाहतूक पोलिसांनी गणेशोत्सवात यंदा पहिल्याच दिवसांपासूनच वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे.

गणेशोत्सव2019 : ‘पीएमपी’च्या लाखभर प्रवाशांना फटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गणेशोत्सव2019 : पुणे - शिवाजी रस्त्यावर बेलबाग ते फडगेट चौक वाहतूक पोलिसांनी गणेशोत्सवात यंदा पहिल्याच दिवसांपासूनच वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. गेल्या वर्षापर्यंत पहिले पाच दिवस वाहतूक सुरू होती. यंदा मात्र, ‘नवी प्रथा’ रूढ केल्यामुळे पीएमपीच्या सुमारे एक लाख प्रवाशांना फटका बसत आहे. या रस्त्यावरील वाहतूक सायंकाळपर्यंत तरी सुरू ठेवा, या पीएमपीच्या कळकळीच्या विनंतीला वाहतूक पोलिसांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. 

शहर आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीच्या वाहतुकीमध्ये शिवाजी रस्त्याला महत्त्व आहे. या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली तर आर्थिक फटका पीएमपीला बसतो आणि दक्षिण पुण्यातील प्रवाशांचेही हाल होतात. गणेशोत्सवात गेल्या वर्षी पहिल्या दिवसापासून ते सातव्या दिवसांपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत पीएमपीच्या बस बेलबाग चौकातून स्वारगेटच्या दिशेने जात होत्या. सायंकाळी गर्दी वाढल्यानंतर त्या बस पर्यायी मार्गाने वळविल्या जात होत्या. यंदा मात्र, वाहतूक पोलिसांनी मॉडर्न कॅफे चौकातूनच बस सकाळपासूनच शिवाजी रस्त्यावर सोडणे बंद केले. त्यामुळे शिवाजी रस्त्यावरील बस जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, शास्त्री रस्तामार्गे कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, अप्पर, सहकारनगर, पद्मावती आदी मार्गांने जात आहेत. 

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच पीएमपी प्रशासनाने वाहतूक पोलिसांकडे वारंवार पत्रव्यवहार केला. तसेच समक्ष बैठकीतही वाहतूक सुरू ठेवण्याचा आग्रह धरला. शनिवारवाडा, अप्पा बळवंत चौक, मंडई, तुळशीबाग परिसरातून नागरिकांना घरी परतायचे असेल तर स्वारगेटपर्यंत पायी चालत जावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी बससेवा सुरू ठेवणे आवश्‍यक आहे, असेही पीएमपीने पोलिसांच्या वारंवार निदर्शनास आणून दिले; परंतु वाहतूक पोलिस ‘हो.... हो...’ म्हणतात, प्रत्यक्षात वाहतूक सकाळपासूनच बंद ठेवली जात आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

बेलबाग चौकातून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक यंदा पहिल्या दिवसांपासूनच बंद केली. कारण, नागरिकांची गर्दी दिवसाही वाढत आहे; परंतु बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याने वाहतूक सुरू आहे.
- पंकज देशमुख, वाहतूक उपायुक्त  
 

बस वाहतूक बंद केल्यामुळे 
  या रस्त्यावरील मार्ग  - सुमारे ४६  
  दिवसभरातील बस  -  सुमारे ३०० 
  बसच्या फेऱ्या  - सुमारे २७००
  प्रवाशांची संख्या -  एक लाख 
  पीएमपीचे आर्थिक नुकसान - किमान ३० लाख रुपये

loading image
go to top