धरण होऊन नऊ वर्षे झाली, पण पाण्याचा पत्ताच नाही...

राजेंद्र लोथे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

खेड तालुक्‍याच्या पूर्व पट्ट्यासह आंबेगाव तालुक्‍यातील सातगाव पठार परिसराला वरदान ठरणाऱ्या सातगाव पठार उपसासिंचन योजनेचे काम रेंगाळले आहे. त्यामुळे कळमोडी धरणाचे काम पूर्ण होऊनही लाभधारक शेतकऱ्यांना आजतागायत या पाण्याचा कोणताही लाभ मिळालेला नाही.

चास (पुणे) : खेड तालुक्‍याच्या पूर्व पट्ट्यासह आंबेगाव तालुक्‍यातील सातगाव पठार परिसराला वरदान ठरणाऱ्या सातगाव पठार उपसासिंचन योजनेचे काम रेंगाळले आहे. त्यामुळे कळमोडी धरणाचे काम पूर्ण होऊनही लाभधारक शेतकऱ्यांना आजतागायत या पाण्याचा कोणताही लाभ मिळालेला नाही.दुष्काळी भागाला वरदान ठरणारी ही योजना कार्यान्वित कधी होणार? याकडे लाभधारक डोळे लावून बसले आहेत. 

खेड तालुक्‍याच्या पश्‍चिमेस भीमा नदीची उपनदी असणाऱ्या आरळा नदीवर कळमोडी गावाजवळ हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या कामास सन 1997 मध्ये मान्यता मिळून सन 2010 मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले. धरणातील पाण्याची साठवण क्षमता 1.514 टीएमसी आहे. धरणास कालवे नाहीत. चासकमान प्रकल्पाचे पुनर्भरण, उपसा सिंचन योजना व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून शेतकऱ्यांनी राबवायच्या सिंचन योजनेद्वारे (लिफ्ट) सिंचन प्रस्तावित आहे. 

या प्रकल्पाचा खेड तालुक्‍यातील आदिवासी पट्ट्यातील 11 वाड्यावस्त्यांना पिण्याचे पाणी व शेतीसाठी उपयोग होणार आहे. तसेच, खेड तालुक्‍यातील उपसा योजनेच्या पहिल्या टप्यानंतर 10 किलोमीटर बंद पाइपद्वारे व वितरण व्यवस्थेद्वारे खेड तालुक्‍यातील 1625 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तसेच, आंबेगाव तालुक्‍यातील उपसा योजनेच्या तिसऱ्या टप्यानंतर बोगद्याद्वारे वेळ नदीत पाणी सोडून नदीवरील पूर्ण झालेल्या कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, माळवाडी, भावडी, कारेगाव, पेठ-1, पेठ-2 व पारगाव या 9 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याद्वारे 3440 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 

173 कोटी रुपये पाण्यात 
कळमोडी धरणात सद्यस्थितीत 100 टक्के पाणी असून, सन 2010 पासून हे धरण नेहमीच शंभर टक्के भरत आलेले आहे. मात्र, उपसा सिंचनाची कोणतीही योजना नसल्याने गेल्या नऊ वर्षापासून या धरणातील पाण्याचा उपयोग हा केवळ चासकमान धरणातील पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी होत आहे. सुमारे 173 कोटी रुपये खर्च करून ज्या उद्देशाने या धरणाची निर्मिती करण्यात आली, तो उद्देश आज असफल होताना दिसत आहे. पाणी असूनही पाण्यासाठी संघर्ष किती काळ चालू राहणार? असा सवाल केला जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The beneficiaries of the Kalmadi Dam are still waiting for water after nine years