

पान २
------
बेदाण्याचे दर स्थिर
मागणी कमी-अधिक; ६५ ते ७० हजार टन बेदाणा शिल्लक
अभिजित डाके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः देशांतर्गत बाजारपेठेत बेदाण्याला कमी-अधिक प्रमाणात मागणी असली, तरी दर स्थिर आहेत. दर्जानुसार बेदाण्याला २४० ते ३५० रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची मागणी वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम दरवाढीवरही होईल, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. सद्यःस्थितीत राज्यात ६५ ते ७० हजार टन बेदाणा शिल्लक आहे.
राज्यात यंदा १ लाख ७० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले आहे. देशभरातील बाजारपेठेत बेदाण्याला चांगली मागणी आणि उठाव असल्याने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दर टिकून आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी विक्रीसाठी पुढे येत असून, आतापर्यंत सुमारे १ लाख १० हजार टन बेदाण्याची विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून देशभरातील बाजारपेठेत बेदाण्याची मागणी काहीशी मंदावली असून, उठावही कमी झाला आहे. मात्र मागणीतील या घसरणीनंतरही बेदाण्याचे दर स्थिर आहेत. आगामी गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सणांच्या १५ ते २० दिवस आधी व्यापाऱ्यांकडून बेदाणा खरेदीला वेग येतो. त्यामुळे पुढील काळात बेदाण्याची मागणी वाढून दरातही सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जून-जुलैदरम्यान बेदाण्याला मागणी अधिक असल्याने बाजारातील उठावही चांगला राहतो. त्यामुळे या कालावधीत दरातही वाढ होते. मात्र यंदा जून-जुलैमध्ये बेदाण्याची मागणी काहीशी मंदावली आहे. तरीही मागणी कमी असतानाही बेदाण्याच्या दरात फारसे चढ-उतार झाले नसून, दर स्थिर राहिले आहेत.
विक्री थांबवून दरवाढीची प्रतीक्षा
एप्रिल-मे महिन्यात बेदाण्याचे दर चांगले होते. जून-जुलैमध्ये दर वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी बेदाणा विक्रीचे नियोजन पुढे ढकलले. मात्र या कालावधीत मागणी कमी झाल्याने एप्रिल-मेच्या तुलनेत दर घटले. त्यामुळे सध्या बेदाणा विक्री थांबवून दरवाढीची प्रतीक्षा करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
बेदाणा दर (प्रति किलो)
हिरवा : २७० ते ३४० रुपये
पिवळा : २४० ते ३५० रुपये
काळा : ५० ते १२० रुपये
कोट
राज्यात अंदाजे ६५ ते ७० हजार टन बेदाणा शीतगृहांमध्ये शिल्लक आहे. सध्या बेदाण्याचे दर टिकून असून, त्यात मोठी तेजी-मंदी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
– सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.