Pune By Election 2023 : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोंडावर मविआत बंड?राजकीय वर्तुळात खळबळ between Kasba, Chinchwad bypoll elections rebellion in mahavikas aghadi Jagdish mulik statement | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Kasba Chinchwad Election News

Pune By Election 2023: कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या तोंडावर मविआत बंड?राजकीय वर्तुळात खळबळ

Pune By Election 2023: पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं दिसून येत आहे. भाजपच्या हेमंत रासने आणि काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

तर चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून महाविकास आघाडीचा राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून नाना काटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे.

महाविकास आघाडीकडून कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपला धक्का देण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, याच पोटनिवडणुकीच्यावेळी भाजपच्या नेत्याकडून एक महाविकास आघाडीचं टेन्शन वाढविणारा दावा केला आहे.

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी मुळीक यांनी महाविकास आघाडीमधील 19 नगरसेवक भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक आहे असा दावा केलाय. यामुळे पुण्यात मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तर यासंबधी बोलताना जगदीश मुळीक म्हणाले की, महाविकास आघाडीमधील 19 नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. कारण आता महाविकासआघाडीच्या हाती काही नाही याची जाणीव नगरसेवकांना झाली आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच गरज लागणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्यास ते इच्छुक आहेत.

तर कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मात्र, धंगेकर यांच्या उमेदवारीवरुन पक्षातील अंतर्गत धूसफूस बाहेर आली आहे. यामुळे काँग्रेसला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर ही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यातच काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, माजी मंत्री रमेश बागवे आणि त्यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक अविनाश बागवे दोघे काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पोटनिवडणुकीपूर्वी काँग्रेसपुढे बंडखोरांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान असणार आहे.