भामचंद्र डोंगराचा कडा कोसळण्याच्या अवस्थेत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

पुणे : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी जिथे अभंग रचले त्या ऐतिहासिक भामचंद्र डोंगराचा काही भाग कोसळण्याची शक्‍यता आहे. ऐन पावसाळ्यामध्ये डोंगरावरील खडकाचा मोठा भाग कधीही कोसळू शकतो, असे धक्कादायक चित्र जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या समितीने केलेल्या पाहणीत दिसून आले. 

पुणे : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी जिथे अभंग रचले त्या ऐतिहासिक भामचंद्र डोंगराचा काही भाग कोसळण्याची शक्‍यता आहे. ऐन पावसाळ्यामध्ये डोंगरावरील खडकाचा मोठा भाग कधीही कोसळू शकतो, असे धक्कादायक चित्र जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या समितीने केलेल्या पाहणीत दिसून आले. 

वारकरी संप्रदायातील मधुसूदन पाटील महाराज 25 जूनपासून भामचंद्र डोंगराच्या दुरवस्थेसंदर्भात भजन व कीर्तन करून आंदोलन करीत आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या आदेशानुसार पाहणी समितीने बुधवारी (ता.4) चाकण औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील फेज दोन येथील भांबोली गावातील भामचंद्र डोंगरावर पाहणी केली. सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या या समितीत डेक्कन कॉलेज ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक डॉ. पांडुरंग साबळे, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने, वास्तुविशारद मृदुला माने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. हेरंबप्रसाद गंधे यांचा समावेश होता. दरम्यान, डोंगरावर मानवी वापरातील पुरातत्त्व वस्तू, खडक आदी अवशेष समितीच्या पाहणीत आढळले. 

इको सेन्सेटिव्ह झोन 
देहूजवळील भंडारा व भामचंद्र डोंगर शासनाने 2011मध्ये राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले होते; परंतु शासनाच्या विविध विभागांनी, बांधकाम विकसकांनी आणि शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या. त्यानंतर पुरातत्त्व विभाग व राज्य शासनाने 252.14 हेक्‍टरवरून 90.04 हेक्‍टर क्षेत्र संरक्षित केले. पुढील आठवड्यात भंडारा डोंगराची पाहणी याच समितीमार्फत केली जाणार आहे. दरम्यान, भामचंद्र डोंगर परिसर इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून आरक्षित आहे. 

दक्‍खन पठारात अशा उभ्या फटी आढळतात. या डोंगरावरील काही भाग नैसर्गिकरीत्या तुटला आहे. खडक दुभंगल्याने सुमारे 300 फूट रुंद आणि 100 फूट लांब आकाराचा कडा धोकादायक ठरू शकतो. येत्या आठ दिवसांत आम्ही आमचा अहवाल सादर करणार आहोत. 
- डॉ. पांडुरंग साबळे, प्राध्यापक, डेक्कन कॉलेज ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट 

डोंगरावरील प्राचीन गुफांना भेगा जात आहेत. तसेच नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन डोंगर वाचवावा. 
- मधुसूदन पाटील, संतभूमी संरक्षक संघर्ष समिती 

समितीचे सदस्य आमच्याकडे या डोंगराबाबत 8 दिवसांत पाहणी अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर आम्ही एकत्रित अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करू. 
- विलास वहाने, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग 
 

Web Title: Bhamchandra Mountains are in danger of collapse