काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी भारत जोडो आंबेगाव यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bharat jodo yatra

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी भारत जोडो आंबेगाव यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद

मंचर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शनिवारी काढण्यात आलेल्या ‘भारत जोडो’ आंबेगाव यात्रेचे मंचर शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. राज्यातील व केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी हातात मशाल व तिरंगा ध्वज होता.

पिंपळगाव फाटा, बाजारसमिती, लक्ष्मी रस्ता या मार्गावर नागरिकांनी यात्रेचे स्वागत केले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, सचिनराव भोर, राजाराम बाणखेले, उषा कानडे, अरुणा थोरात, सुषमा शिंदे, मथाजी पोखरकर, मच्छिंद्र गावडे, अरविंद वळसे पाटील आदी मान्यवर अग्रभागी होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूप पुतळ्याला भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष अँड प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनतर यात्रेच्या सांगता सभेत विष्णू हिंगे व सुरेश भोर यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली.ते म्हणाले “राज्यात सत्तेवर आलेले शिंदे फडणवीस सरकार हे विश्वासघातकी सरकार आहे.राज्यातील अनेक प्रकल्प गुजरात राज्यात जात असूनही हे दोन्ही नेते गप्प आहेत.

महागाईने जनता होरपळली आहे. या मुद्द्याहून लक्ष विचलित करण्यासाठी सतत महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विरोधात खोटेनाटे आरोप करून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे.” कॉंग्रेसचे नेते अँड.बाळासाहेब बाणखेले यांचे भाषण झाले. रमेश खिलारी यांनी सूत्रसंचालन केले.मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी १२ किलोमीटर अंतर अनवाणी सहभाग नोंदविला. राजेंद्र थोरात, प्रवीण मोरडे, सुरेश निघोट,दत्ता थोरात, लक्ष्मण थोरात भक्ते यांनी व्यवस्था पहिली.

“कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला पाठींबा देण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मस्थळ महाळुंगे पडवळ गावापासून यात्रा काढण्यात आली. राज्यात तालुका पातळीवर निघालेली ही पहिलीच यात्रा आहे.सध्या सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे.शेतीमालाला बाजारभाव व रोजगार निर्मितीच्या घोषणा हवेतच फिरत आहेत.जनतेची निराशा करणाऱ्या सरकारला धडा शिकविण्यासाठी व अन्यायाला सडेतोड उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी चे कार्यकर्ते या भागात मजबुतपणे काम करणार आहे.”

अँड प्रदीप वळसे पाटील, उपाध्यक्ष भीमाशंकर साखर कारखाना.