भाजपच्या हाती २३ महिने

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 March 2020

अनपेक्षितपणे भरारी घेत भारतीय जनता पक्षाने महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली. या घटनेला तीन वर्षांचा कालावधीत उलटला आहे. आता केवळ २४ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.

पिंपरी - अनपेक्षितपणे भरारी घेत भारतीय जनता पक्षाने महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली. या घटनेला तीन वर्षांचा कालावधीत उलटला आहे. आता केवळ २४ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यातील फेब्रुवारी २०२२ हा निवडणूक आचारसंहितेत जाणार असल्याने उर्वरित २३ महिन्यांतच त्यांना ‘विकास’ दाखवावा लागणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत भाजपने तत्कालीन शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि विद्यमान शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मुसंडी मारली. गेले पंधरा वर्ष एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीला धक्का दिला आणि ७७ नगरसेवकांच्या जोरावर महापालिकेत सत्ता मिळवली. कारण, २०१७ पूर्वी भाजपचे केवळ चार नगरसेवक होते. गेल्या तीन वर्षांत तीन महापौर व तीन स्थायी समिती सभापती झाले. यातील दोन महापौर भोसरी विधानसभा मतदारसंघातील तर, विद्यमान महापौर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आहेत. प्रत्येकी सव्वा महिन्याचा कालावधी त्यांना मिळालेला आहे. पक्षातून आणखी एका नगरसेवकाला महापौरपदाची संधी मिळू शकते. महापालिका तिजोरीची चावी, अशी ओळख असलेल्या स्थायी समितीचे दोन सभापती भोसरी मतदारसंघातील व एक सभापती चिंचवड मतदारसंघातील झाला आहे. नवीन सभापतीची निवड शुक्रवारी (ता. ६) होणार आहे.

हेही वाचा :  ससूनमध्ये गरीब रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

त्यासाठी सोमवारी (ता. २) दुपारी तीन ते सायंकाळी पाचपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. पक्ष आता कोणाला संधी देतो? त्यावर पुढची वाटचाल अवलंबून राहणार आहे. कारण, पक्षीय हितापेक्षा शहर विकास व जनतेच्या सोयी-सुविधांकडे त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. शिवाय, पक्षाच्या शहराध्यक्षपदाची सूत्रे तीन महिन्यांपूर्वी बदलली आहेत. आमदार जगताप यांच्याकडून आमदार लांडगे यांच्याकडे सूत्रे आलेली आहेत. म्हणजेच चिंचवड मतदारसंघाकडून भोसरी मतदारसंघाकडे पक्षाची सूत्रे हलली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत महापालिकेतील सत्ता भाजपकडे राखण्यासाठी विद्यमान अध्यक्षांसह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनाही ‘काम’ दाखवावे लागणार आहे. 

टीका, आरोप अन्‌ नाराजी
गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि विद्यमान शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी शहराची विभागणी ‘पवना नदीच्या अलीकडे व पलीकडे अशी करून घेतली’, अशी टीका होत आहे. तसेच, यंत्राद्वारे रस्ते सफाई, स्मार्ट सिटीअंतर्गत कामे, कचरा संकलन अशा अनेक मोठ्या रकमेच्या विषयांबाबतही भाजपवर टीका केली जात आहे. ‘विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना सभागृहात बोलू दिले जात नाही, सभाशास्त्राचे संकेत पायदळी तुळवले जात आहेत,’ असा शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आरोप आहे. ‘दिवसाआड पाणीपुरवठा’, ‘रस्त्यांवरील खड्डे’ आदींबाबतही नागरिकांमध्ये नाराजी आहे. 

विरोधक आक्रमक
राज्यात सत्तांतर झाले आहे. भाजपची सत्ता जाऊन एकेकाळचा मित्रपक्ष शिवसेना, विरोधक राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्याचे पडसाद महापालिका सभागृहातही दिसू लागले आहेत. सत्ताधारी भाजपच्या विरोधात शिवसेना व राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. हेच चित्र स्थायी समिती बैठकीतही बघायला मिळत आहे. त्यामुळे भाजपची वाटचाल बिकट दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharatiya Janata Party complete three years in PCMC