अबब! ४२ लाखांची इंजेक्‍शन मोफत; ससूनमध्ये गरीब रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 मार्च 2020

रुग्णाला हिमोफिलियाच्या शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव होण्याचा धोका होता. तो टाळण्यासाठी त्याला ‘तीन फॅक्‍टर’ची आठ इंजेक्‍शन देण्यात आली; पण त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. त्यामुळे रुग्णाला फिबाची ११७ इंजेक्‍शन देऊन ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या इंजेक्‍शनचा खर्च ४२ लाख १२ हजार रुपये होता.

पुणे - हिमोफिलियाच्या रुग्णाचा खुबा बदलण्याची आव्हानात्मक शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात यशस्वी झाली. रुग्णाला हिमोफिलियाच्या शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव होण्याचा धोका होता. तो टाळण्यासाठी त्याला ‘तीन फॅक्‍टर’ची आठ इंजेक्‍शन देण्यात आली; पण त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. त्यामुळे रुग्णाला फिबाची ११७ इंजेक्‍शन देऊन ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या इंजेक्‍शनचा खर्च ४२ लाख १२ हजार रुपये होता. आरोग्य खात्याकडून ही इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे या गरीब रुग्णावर ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

 हिमोफिलियाच्या आजाराच्या या ३५ वर्षीय पुरुषाला आंघोळ करतानाच चक्कर आली. त्यामुळे त्याच्या मांडीचे हाड तुटले. त्या रुग्णाला २३ नोव्हेंबर २०१९ रोजी उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल केले. तुटलेले हाड जुळण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्‍यक होती. मात्र, रुग्ण हिमोफिलियाचा असल्याने शस्त्रक्रियेपूर्वी त्याला ‘तीन फॅक्‍टर’ची आठ इंजेक्‍शन देण्यात आली. त्यामुळे शस्त्रक्रियेतून होणारा रक्तस्राव बंद होतो; पण हे इंजेक्‍शन देऊनदेखील रुग्णाच्या पायाची सूज कमी झाली नाही. त्यानंतर रुग्णाची ‘इनहिबिटर’ ही चाचणी केली. 

या चाचणीतून ‘फॅक्‍टर’ इंजेक्‍शनचे डोस निरुपयोगी ठरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यावर उपाय म्हणून शस्त्रक्रियेसाठी या रुग्णाला ‘फिबा’ हे इंजेक्‍शन द्यावे लागणार होते. याचा खर्च मोठा होता. त्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधला. या विभागाकडून या शस्त्रक्रियेसाठी इंजेक्‍शन उपलब्ध झाले. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी लागलेल्या फिबाच्या इंजेक्‍शनची किंमत ४२ लाख १२ हजार आहे . शस्त्रक्रियेचा खासगी रुग्णालयातील खर्च सहा लाख रुपये आहे. हे सर्व उपचार ससून रुग्णालयात मोफत करण्यात आले.  ही शस्रक्रिया डॉ. अजय चंदनवाले, डॉ. राहुल पुराणिक आणि त्यांच्या पथकाने केली. 

बाळासाहेबांनी भाजपला पाठींबा दिला होता, पण... : शरद पवार

डॉ. सोनाली साळवी, औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. ए. सांगळे यांनी हिमोफिलिया आणि फॅक्‍टर व्यवस्थापन केले. डॉ. सूरज जाधवर व डॉ. योगेश गवळी यांनी भूलतज्ज्ञ म्हणून काम पाहिले. हिमॅटॉलॉजिस्ट डॉ. सविता रंगराजन यांनी मार्गदर्शन केले.

काय आहे हिमोफिलिया आजार?
    हिमोफिलिया हा आनुवंशिक आजार आहे.
    या आजारामुळे रुग्णाला इजा झाल्यास होणारा रक्तस्राव लवकर बंद होत नाही. 
    अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे जोखमीचे असते.
    रक्तस्त्राव टाळण्यासाठी रुग्णाला शस्त्रक्रियेपूर्वी विशिष्ट इंजेक्‍शन द्यावी लागतात.
    या इंजेक्शनचा खर्चही मोठा असतो.

 ससून सर्वोपचार रुग्णालय हे गरीब रुग्णांचे आशास्थान आहे. ससून रुग्णालयामधील रुग्णसेवेचा दर्जा उंचावला आहे. त्यामुळे या रुग्णालयात हेमिआर्थ्रोप्लास्टीसारखी आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी होते, हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. 
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poor patient surgery successful in Sassoon