
Bhausaheb Patil : भाऊसाहेबांच्या स्मृतीत गढून गेली संध्याकाळ!
पुणे : कंपनीचा विकास हाच ‘त्यांचा’ श्वास होता. शिकण्याची आस, सळसळती ऊर्जा, संवाद कौशल्य, समन्वय आणि समस्येवर हमखास उपाय शोधण्याची तल्लख बुद्धी. असे व्यक्तीमत्त्व म्हणजे दिवंगत भाऊसाहेब पाटील.
ते पदाने ‘सकाळ’चे संचालक होते. खऱ्या अर्थाने ते सहृदयी सहकारी, उत्तम गुणांचे पारखी होते. अफाट लोकसंपर्क आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांना होती. त्यांच्याबद्दलच्या अशा अनंत स्मृतींत ‘सकाळ’चे कुटुंब आणि भाऊसाहेबांचा मित्रपरिवार आज गढून गेला. कधी हास्याची कारंजी तर, कधी डोळ्यांच्या कडा पाणावणारे प्रसंग!
निमित्त होते भाऊसाहेब पाटील यांचा कार्यकर्तृत्वावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशनाचे. ‘सकाळ''मध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून ते रुजू झाले. आव्हानांवर मात करण्याची जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा अशा बलस्थानावर त्यांनी संचालक पदापर्यंतचा प्रवास केला. त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि त्यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या विविध पैलूंचा वेध पुस्तकातून घेतला आहे.
‘सकाळ’ प्रकाशनाच्या ‘बीइंग भाऊसाहेब’ नावाच्या या पुस्तकाचे प्रकाशन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या हस्ते झाले. संपादक संचालक श्रीराम पवार, भाऊसाहेब पाटील यांच्या पत्नी अलका यांच्यासह विजया पाटील, उदय जाधव, महेंद्र पिसाळ, नवल तोष्णीवाल, रवी वहाडणे, ‘सकाळ’ परिवारातील आजी-माजी सदस्य आणि भाऊसाहेबांचा मित्रपरिवार उपस्थित होता.
‘सकाळ’ प्रकाशनच्या अमृता देसरडा यांनी हे पुस्तक शब्दबद्ध केले आहे. कर्मचारी आणि कंपनी यांच्यातल्या विलक्षण नात्याचा परिचय या पुस्तकातून उलगडतो आहे. भाऊसाहेब पाटील यांची कन्या वृषाली, चिरंजीव विनय यांनी आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक श्रीराम पवार यांनी केले. मंदार कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
आर्थिक परिस्थितीमुळे शिकता न आलेल्या मुलांना काम करतानाच उच्च शिक्षणाची संधी ‘सकाळ’ने मिळवून दिली. शिक्षण घेत असताना आणि काम करण्याची संधी तरुण मुलांना उपलब्ध करून देण्याचे वातावरण संस्थेने जपले आहे. अशा संस्कृतीमधून प्रेरित झालेल्या मुलांनी ‘सकाळ’चा विकास केला. त्यात भाऊसाहेब पाटील हे एक होते.
- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ
भाऊसाहेब ‘फिटनेस’बद्दल जागृत होते. त्यांच्या मदतीने ‘लास्ट संडे ऑफ द मंथ’ वेगवेगळ्या भागात दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आयोजित करता आली. कामाची आखणी आणि ते तडीस नेण्यासाठीचे नियोजन त्यांच्याकडून शिकता आले.
- संतोष मोरे, सिंहगड रस्ता
भाऊसाहेब शिक्षणाने अभियंते होते. कोणतीही समस्या सोडविण्याची किमया त्यांच्याकडे होती. जगात मोठे अभियंते आहेत. त्यांच्यात आणि भाऊसाहेबांमध्ये मुख्य फरक आहे, तो म्हणजे भाऊसाहेब ‘इंजिनिअर योगी’ होते. कर्मयोग काय असतो, हे त्यांच्याकडे बघून कळतो. ते गुणांचे पारखी होते.
अभिजित पवार, व्यवस्थापकीय संचालक, सकाळ
सातत्याने कार्यमग्न राहणे हाच बाबांचा आनंद होता. ते आमच्या ऊर्जेचा स्रोत होता. सतत नवे शिकत राहणे, हे त्यांचा छंद होता.
- वृषाली पाटील, भाऊसाहेब यांची कन्या