

Bhawadi solar project protest
sakal
मंचर : आंबेगाव तालुक्यातील भावडी ग्रामपंचायतीच्या तेरा हेक्टर गायरान जमिनीपैकी सुमारे दहा हेक्टर क्षेत्रावर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प योजनेअंतर्गत सौर प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले असून, या ठिकाणी सुमारे पाच हजार झाडांची तोड झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावकऱ्यांना विश्वासात न घेता प्रकल्प राबविला जात असल्याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी (ता.१३)काम बंद पाडले.
मंचर–कुरवंडी रस्त्यालगत भावडी गावच्या गायरान क्षेत्रात २० ते २५ फूट उंचीची विविध जातींची झाडे विनापरवाना तोडण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची बैठक झाली. प्रकल्पामुळे भावडी–बहिरवाडी मार्गे राजगुरुनगर हा प्रमुख मार्ग कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. तसेच गावातील विविध विकासकामांवर व शेती व्यवसायावरही परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.