
भिडे पुल पाण्याखाली गेल्याने पुल वाहतुकीसाठी बंद
पुणे - मुठा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मंगळवारी रात्री डेक्कन नदीपात्रातील भिडे पुल पाण्याखाली गेला. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासूनच भिडे पुल वाहतुकीस बंद करण्यात आला असून वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला आहे.
शहरात आणि खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मागील २-३ दिवसात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मंगळवारपासून खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री १० वाजता डेक्कन नदीपात्रातील भिडे पुल पाण्याखाली गेला. त्यामुळे डेक्कन वाहतूक विभागाकडून मंगळवारी रात्रीपासूनच भिडे पुल वाहतुकीस बंद करण्यात आला. पोलिसांनी डेक्कन बसस्थानक पासून भिडे पुलाकडे जाणारा रस्ता तसेच नारायण पेठेकडून डेक्कनकडे जाणारी वाहतुक बंद केला, त्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स टाकून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वाहन चालकांनी डेक्कन येथील खंडोजी बाबा चौक येथून शहरात व याच पुलावरून कर्वे रस्त्यावर किंवा लाल बहादूर शास्त्री रस्ता मार्गे कर्वेनगर, कोथरूड परिसरात जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा असे आवाहन डेक्कन वाहतूक विभागाने केले आहे.