

भीमा नदीकाठी सलग सहा तास वीज द्या
-----------
-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
-मागण्या मान्य न झाल्यास कायदा हातात घेण्याचा राजू शेट्टींचा इशारा
ॲग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना सलग सहा तास आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कृषी पंपांसाठी आठ तास सुरळीत वीजपुरवठा करावा, यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (ता.२२) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
सकाळी अकरा वाजता हुतात्मा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हा्ध्यक्ष विजय रणदिवे, सचिन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी शेतकरी यामध्ये सहभागी झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर झालेल्या सभेत माजी खासदार शेट्टी यांनी सरकार आणि प्रशासनावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. ते म्हणाले, "एका बाजूला कर्नाटकातील शेतकरी भीमा नदीतून सर्रास पाणी उपसा करत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केवळ दोनच तास वीज दिली जात असल्याने त्यांना पाणी उपसा करता येत नाही. त्यातच महाराष्ट्रात पाणी उपशाला परवानगीही नाकारली जात आहे. हा अत्यंत चुकीचा आणि अन्यायकारक कारभार आहे. पाणी वाटपामध्ये मोठा ढिसाळपणा झाला असून, या संपूर्ण पाणी वाटपाचे ऑडिट झाले पाहिजे." सध्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पिके वाळून चालली असल्याने शेतकऱ्यांना किमान ७ ते ८ तास वीज देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांवरून आणि बँकांच्या जप्ती कारवाईवरून राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "गेल्या ४ महिन्यांपासून साखर कारखाने बंद झाले आहेत, तरीही कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्याप एफआरपी दिलेली नाही. त्यांच्यावर प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. दुसरीकडे, कर्जापायी बँका मात्र शेतकऱयांच्या घरातील भांडीकुंडी जप्त करत आहेत. बँका जर अशा पद्धतीने वागणार असतील, तर शेतकरीही शांत बसणार नाहीत. शेतकरी थेट कारखान्यांचे चेअरमन आणि संचालकांच्या घरातील भांडीकुंडी बाहेर काढतील. जर सरकार कायद्याने काम करणार नसेल, तर शेतकऱ्यांनाच कायदा हातात घ्यावा लागेल," असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी जिल्हाधिकाऱी एस. कार्तिकेयन यांना भेटून निवदेन देण्यात आले.
-------------------
चौकट-१
--
मोर्चातील प्रमुख मागण्या :-
-----------------
-भीमा नदीकाठचा वीजपुरवठा सलग ६ तास, तर जिल्ह्यातील कृषी पंपांसाठी ८ तास सुरळीत वीज द्यावी.
-उजनी धरणातून भीमा नदीत जुलै महिन्यात आणखी एक पाण्याची पाळी सोडण्यात यावी.
-सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले तात्काळ जमा करावीत.
-ऊस बिले जमा नसतानाही ती जमा केल्याची खोटी माहिती देणाऱ्या साखर कारखानदारांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या लेखापरीक्षकांवर (ऑडिटर्स) कडक कारवाई व्हावी.
-महापुरात नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनींची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी.
---
एजीएनएसएलपी२२पी०२
सोलापूर ः भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना सलग सहा तास वीजपुरवठा करावा, यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (ता.२२) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.