Pune : ‘भीमाशंकर’ने फोडली ‘एफआरपी’ची कोंडी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

frp
‘भीमाशंकर’ने फोडली ‘एफआरपी’ची कोंडी!

‘भीमाशंकर’ने फोडली ‘एफआरपी’ची कोंडी!

पारगाव : येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये गाळप होणाऱ्या उसास एफआरपीनुसार एकरकमी २६१३ रुपये प्रतिटन देणार आहे. भीमाशंकर कारखान्याने जिल्ह्यात सर्वांच्या अगोदर एफआरपी जाहीर करून एफआरपीबाबतची कोंडी फोडली असून, तीही एकरकमी देण्याचे जाहीर केल्याने जिल्ह्यातील इतर कारखान्यांपुढे एकरकमी एफआरपी देण्याचे आव्हान निर्माण केले आहे.

याबाबत कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी माहिती दिली की, एफआरपीबाबत गृहमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत निर्णय घेण्यात आला. कारखान्याने आतापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच चांगला दर दिलेला आहे. कारखान्याने एफआरपी एकरकमी देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. पंधरावडा ऊस बिलाप्रमाणे उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येईल.
कारखान्याने आधुनिकीकरण व विस्तारीकरणाची कामे केल्यामुळे गाळप क्षमतेत वाढ झालेली आहे.

गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये कारखाना कार्यक्षेत्र व परिसरात झालेल्या नोंदीनुसार दहा लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यादृष्टीने हार्वेस्टर, ट्रक / ट्रॅक्टर टोळीसह, ट्रॅक्टर टायरगाडी व बैलटायरगाडी यांचे करार केलेले असून, सोमवारअखेर (ता. २२) एक लाख ५९ हजार टन उसाचे गाळप करून ९.९५ टक्के सरासरी साखर उताऱ्याने एक लाख ५५ हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास ऊस गाळपास देवून सहकार्य करावे, असे आवाहन बेंडे यांनी केले.

टॅग्स :Pune NewsFRP