

मंचर, ता. ४ : श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील दरडप्रवण भीमाशंकरवाडी येथील ९६ बाधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सव्र्हे क्रमांक १ मध्ये हे पुनर्वसन करण्यात येणार असून, त्यासाठी आदर्श पुनर्वसन आराखड्यासही मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाला ५०० चौरस फुटाचा भूखंड मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने गुरुवारी (ता. ३) जारी केला आहे, अशी माहिती माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
श्री क्षेत्र भीमाशंकर हे राज्यातील महत्त्वाचे धार्मिक व पर्यटनस्थळ आहे. वर्षभर येथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात. सन २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान गावठाणातील दाट व अनियोजित बांधकामे, अपुरे प्रवेश व निर्गमन मार्ग, मर्यादित मोकळी जागा आणि आपत्कालीन यंत्रणांच्या हालचालीतील अडचणी लक्षात घेता परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्याची गरज निर्माण झाली आहे.
भीमाशंकरवाडी परिसर अतिवृष्टी, भूस्खलन, दरड कोसळणे आणि जमीन खचणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या दृष्टीने संवेदनशील आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या पथकाने केलेल्या पाहणीत ही वस्ती मध्यम ते तीव्र उतारांनी वेढलेल्या ‘यू’ आकाराच्या खोऱ्यात असल्याचे निदर्शनास आले आहे. नैसर्गिक जलनिस्सारणातील कमतरता, उतारावरील खोदकाम आणि वाढता मानवी हस्तक्षेप यामुळे उताराच्या स्थैर्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्शभूमीवर नियोजित पुनर्वसन कार्यवाही होणार आहे.
दृष्टीक्षेपात पुनर्वसन
• पुनर्वसनातील प्रत्येक पात्र कुटुंबाला किमान ५०० चौरस फुटांचा स्वतंत्र भूखंड मिळणार.
• मूळ जागेच्या क्षेत्रफळानुसार अधिक क्षेत्र देण्याचीही तरतूद आहे.
• रोख मोबदल्याऐवजी नियमानुसार घरकुल बांधून देण्याचे प्रस्तावित आहे.
• जमीन संपादनासाठी १५ कोटी, तर बांधकामासाठी ४६ कोटी ८० लाख रुपये तरतूद आहे.
• पुनर्वसन वन, वन्यजीव, पर्यावरण व तांत्रिक परवानग्यांच्या अधीन राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.