
पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी संगीत महोत्सवाचा समारोप
पुणे : सतारवादन, कथक नृत्य आणि शास्त्रीय गायनाच्या बहारदार सादरीकरणाने महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी संगीत महोत्सवा'चा मंगळवारी समारोप झाला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
महोत्सवाचा दुसर्या दिवशीचा प्रारंभ विलायत खानी घराण्याचे पं. मारुती पाटील यांच्या सतारवादनाने झाला. राग मारवाने त्यांनी वादनाला सुरुवात केली. त्यांना तबल्यावर चारुदत्त फडके यांनी तर तानपुऱ्यावर धनश्री भडकमकर यांनी साथ दिली. त्यानंतर कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस आणि समूहाने नृत्य सादर केले. त्यांना तबल्यावर निखिल फाटक, संवादिनीवर यशवंत थिटे आणि पढंतची साथ जुई सगदेव यांनी दिली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात किराणा घराण्याचे गायक आणि पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. आनंद भाटे यांचे सादरीकरण झाले. राग शुद्धकेदारने त्यांनी गायनाला सुरुवात केली. त्यानंतर 'केतकी गुलाब जुई चंपक बन फुले' ही रचना आणि पं. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या इतर काही रचना सादर केल्या. त्यांना तबल्यावर भरत कामत, संवादिनीवर निरंजन लेले आणि तानपुऱ्यावर ईश्वरी श्रीगार यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे निवेदन नेहा परांजपे यांनी केले.
Web Title: Bhimsen Joshi Birth Centenary Music Festival Over Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..