महत्त्वाची बातमी : पुणे जिल्ह्यातील `हा` भाग उद्यापासून सात दिवस राहणार बंद 

विजय जाधव
Friday, 11 September 2020

भोर शहर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; वैद्यकीय सुविधा सुरू राहणार 

भोर (पुणे) : प्रशासनाने भोर शहर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. त्यामुळे रविवारपासून पुढील सात दिवस शहर बंद राहणार आहे. शहरात रविवारपासून (ता.13) शनिवारपर्यंत (ता. 19) केवळ वैद्यकीय सुविधा वगळता इतर सर्व सुविधा बंद राहणार आहेत, अशी माहिती तहसीलदार अजित पाटील यांनी दिली. 

पुणेकरांनी काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन; रोजच्या तपासणीत 28 टक्के कोरोनाबाधित

भोर शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, शुक्रवारी (ता. 11) सकाळपर्यंत शहरातील 39 ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन बनविण्यात आली आहेत. परंतु, तरीही कोरोनाचा आकडा कमी झालेला नाही. त्यामुळे नगरपालिकेने संपूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र करावे, असा अहवाल तहसीलदारांकडे पाठविला आहे. त्यानुसार रविवारपासून सर्व शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. प्रांताधिकाऱ्यांकडून शनिवारी(ता. 12) याबाबतचे आदेश आल्यानंतर याबाबतची अधिकृत कारवाई सुरु होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, शहरातील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे आमदार संग्राम थोपटे यांनी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, गटनेते सचिन हर्णसकर आदींसमवेत बैठक घेऊन चर्चा केली. त्यावेळी आमदार थोपटे यांनीदेखील भोर शहर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्याची सूचना प्रशासनास केली होती. 

नागरिकांमध्ये अद्यापही संभ्रम 
भोर शहरात आठ दिवसांसाठी लॉकडाउन होणार असल्याचे या पूर्वी 2 सप्टेंबरला नगरपालिकेने ऑटो रिक्षामधून दवंडी देऊन जाहीर केले. परंतु, अधिकृत आदेश नसल्यामुळे लॉकडाउन होणार नसल्याचे सांगण्यात आले. या वेळीही प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्याचे आदेश अद्याप दिलेले नाहीत. तरीही सोशल मिडीयावर भोर बंदच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे भोर शहर नक्की बंद राहणार का? याबाबत नागरिकांच्या मनात संभ्रमावस्था आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhor city will be closed for seven days from tomorrow