भोरचे निसर्गसौंदर्य पर्यटकांसाठी पर्वणी
भोर, ता. १६ : भोर तालुक्यात असलेले निसर्गसौंदर्य हे पर्यटक आणि पक्षीप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे. त्यामुळे तालुक्यातील नैसर्गिक गोष्टी पाहण्यासाठी अनेक हौशी पर्यटक व पक्षीप्रेमी भोर परिसरात येत आहेत.
तालुक्यातील नेकलेस पॉइंट, भाटघर धरण, नीरा-देवघर धरण, शनीघाट, राजवाडा, वरंधा घाट व मांढरदेवी घाट या प्रमुख ठिकाणांशिवाय नद्यांच्या कडेला असलेली झाडे-झुडपे आणि त्यांचे नदीच्या पाण्यात पडलेले प्रतिबिंब मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेक पर्यटक भोरच्या नदीकिनारी वेळ घालवताना दिसत आहेत.
भोरचा परिसर शांत आणि सुरक्षीत असल्यामुळे अनेक पर्यटक एक दिवसाच्या आऊटींगसाठी भोरची निवड करतात. शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, हिरवेगार डोंगर, धरणे व नद्यांमधील पाणी, पक्षांची किलबिल, मध्येच दृष्टीस पडणारे जंगलातील प्राणी व पक्षी आदींसह गावरान पद्धतीचा नाष्टा व जेवण मिळत असल्यामुळे पर्यटकांना भोर परिसराची भुरळ नेहमीच पडलेली असते.
सद्यःस्थितीत थंडीच्या दिवसात पहाटे आणि सकाळी नदीच्या किनारी अनेक पक्षी दिसत असतात. शिवाय सकाळी-सकाळी नदीच्या पाण्याच्या वाफांचे दृश्यही मनमोहक असते. सध्या धरणातील पाण्याचा विसर्ग बंद असल्यामुळे नदीच्या पाणी शांत आहे. त्यामुळे शांत पाण्यात किनाऱ्यावरील गोष्टींचे प्रतिबिंब खूपच छान दिसत आहे. याचे क्षण आणि छायाचित्रे टिपण्यासाठी पर्यंटक नदीकिनारी थांबत आहेत.
06329

