प्रजासत्ताक दिनानिमित्त भोसरी परिसर तिरंगामय
भोसरी, ता. २४ ः प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यालयाद्वारे भोसरीतील ऐतिहासिक प्रवेशद्वार, इ क्षेत्रीय कार्यालय, भोसरी गावठाणातील कबड्डी केंद्र, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून ती रंगीबेरंगी प्रकाशाने उजळून निघाली आहेत.
देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवारी (ता. २६) देशभर साजरा होत आहे. लोकशाहीचा हा उत्सव पिंपरी चिंचवड महापालिकेतही मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. महापालिकेच्या भोसरीतील इ क्षेत्रीय कार्यालयात अधिकाऱ्यांद्वारे तिरंगा झेंड्याला वंदन होणार आहे. यावेळी इ क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे यांच्यासह स्थापत्य, विद्युत, आरोग्य आदींसह इतरही विभागांतील कार्यकारी अधिकाऱ्यांसह पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
भोसरीतील लांडेवाडीतील ऐतिहासिक प्रवेशद्वार, इ क्षेत्रीय कार्यालय, भोसरी गावठाणातील कबड्डी केंद्र, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह या सर्व वास्तू मुख्य रस्त्यांपासून जवळ असल्याने भोसरीसह पंचक्रोशीतील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. भोसरीसह दिघी आणि इंद्रायणीनगर परिसरातील दुकानांमध्ये विक्रीसाठी तिरंगी झेंडे, त्याचप्रमाणे तीन रंगांतील हवेत फिरणारी चक्रे विक्रेत्यांद्वारे रस्त्यावर ठेवण्यात आली असल्याने या परिसरातील वातावरण तिरंगी झेंडामय झाले आहे.
शाळांचीही तयारी
प्रजासत्ताक दिनानिमित्त इंद्रायणीनगर, दिघीसह भोसरीतील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयासह विविध कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यायांद्वारेही प्रजासत्ताक दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. रविवारी (ता. २५) साप्ताहिक सुटी असल्याने शाळा आणि महाविद्यालयांनी प्रजासत्ताक दिनाच्या तयारीची रंगीत तालीम शनिवारी (ता. २४) घेतली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त भोसरीतील शासकीय इमारतींसह लांडेवाडीतील ऐतिहासिक प्रवेशद्वारावर विद्युत रोषणाई केली आहे. ही विद्युत रोषणाई भारताच्या तिरंगी झेंड्यातील रंगांप्रमाणे आहे. त्याचप्रमाणे विद्युत रोषणाई ही सतत बदलत्या स्वरूपात ठेवल्याने नागरिकांचे लक्ष वेधत आहे.
- संतोष दुर्गे, कार्यकारी अभियंता (विद्युत विभाग), इ क्षेत्रीय कार्यालय

