Big Breaking : यंदाचा आषाढी वारी पायी दिंडी सोहळा रद्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

यंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकाॅप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय. 

पुणे  : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी वारी पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आला आहे. परंतु देहू, आळंदीवरून पालख्यांचे पंढरपूरला प्रस्थान होणार असून, पादुका आषाढ शुद्ध दशमीला वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झाले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरीच्या आषाढी वारीच्या स्वरुपाबाबत वारकरी संप्रदायासह सर्वांचे लक्ष लागले होते. या संदर्भात शुक्रवारी (ता.29) पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा प्रमुख आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

येत्या जून महिन्यात होणाऱ्या आषाढी वारीबाबत यापूर्वी झालेल्या बैठकीत पवार यांनी सोहळा प्रमुख आणि मानकरी यांच्याशी चर्चा केली होती. आळंदी देवस्थानने तीन पर्याय सुचविले होते. त्यात पहिला चारशे वारकरी पायी किंवा दुसरा शंभर वारकरी पायी चालत जाणे. ते शक्य न झाल्यास 30 वारकऱ्यांनी समवेत पादुका वाहनातून थेट दशमीला पंढरपुरात नेण्याचा तिसरा पर्याय दिला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संत तुकाराम महाराज पालखी सोहळाप्रमुखांनी पन्नास वारकऱ्यांसमवेत पायी जाण्याचा पर्याय दिला होता. संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई आणि संत सोपानदेव संत एकनाथ यांच्या पादुका दशमीलाच वाहनाने थेट पंढरपुरात नेण्यास परवानगी द्यावी, अशा आशयाचे एकत्रित निवेदन सोपानदेव पालखी सोहळाप्रमुख ॲड. गोपाळ महाराज गोसावी दिले होते. तर, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे यांनी हेलिकॉप्टरने नेण्याचा पर्याय सुचविला होता. या संदर्भात आजच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री पवार यांनी सांगितले होते. या वेळी सरकारचा निर्णय अंतिम असेल, असेही देवस्थानांच्या प्रमुखांनी सांगितले होते.

हेही वाचा > धक्कादायक! शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक जेव्हा शेतकर्‍यासमोर येतो...अन् मग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big decision regarding Wari in the meeting of Deputy Chief Minister Ajit Pawar