esakal | अरे वा, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

narayangaon tomato

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबजारात टोमॅटोची आवक घटली आहे. त्यामुळे टोमॅटो आहेत का टोमॅटो, असे म्हणण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे.

अरे वा, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस

sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबजारात टोमॅटोची आवक घटली आहे. त्यामुळे टोमॅटो आहेत का टोमॅटो, असे म्हणण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. उपबजारात आज १३ हजार ९०० टोमॅटो क्रेटची आवक झाली. प्रतवारीनुसार टोमॅटो क्रेटला (वीस किलो) २०० रुपये ते ८०० रुपयांदरम्यान या हंगामातील उच्चांकी भाव मिळाला. त्यामुळे अवर्षणग्रस्त असलेल्या पारनेर, बारामती, बीड, श्रीगोंदा, जामखेड या भागातील टोमॅटो उत्पादक शेतकरी मालामाल झाले आहेत.  ऑगस्ट महिन्यात टोमॅटो खरेदी विक्रीतून सुमारे पंचवीस कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जुन्नर, आंबेगाव तालुका टोमॅटो उत्पादनात राज्यात अग्रेसर आहे. मात्र, या वर्षी ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील टोमॅटोसह भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरवर्षी जून ते ऑगस्ट या महिन्यात उपबजारात रोज सुमारे पन्नास ते साठ हजार टोमॅटो क्रेटची आवक होत होती. या वर्षी या कालावधीत रोज जेमतेम पंधरा ते वीस हजार क्रेटची आवक झाली. या वर्षी अवर्षणग्रस्त असलेल्या पारनेर, बारामती, बीड, श्रीगोंदा, जामखेड, सुपे, शिरूर या भागातील टोमॅटोची येथील उपबजारात जूनपासून टोमॅटोची आवक होत आहे. सध्या येथील उपबजारात अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांचाच बोलबाला आहे.

पुण्यात चार लाख नागरिकांना ई पास

याबाबत सभापती संजय काळे यांनी सांगितले की, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील टोमॅटोचा तोडणी हंगाम मार्च महिन्यात सुरू झाला. त्यानंतर लॉकडाउन, कोरोना संसर्ग, मजुर टंचाई आदी समस्यांमुळे टोमॅटो शेतात खराब झाली. तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील टोमॅटोसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. या वर्षी उन्हाळी हंगाम वाया गेला. त्यामुळे जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, या वर्षी नगर, बीड या अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी शेततळ्यातील पाण्यावर मल्चिंग कागद, ठिबक सिंचनाचा वापर करून टोमॅटोचे पीक घेतले आहे. या भागात पाऊस कमी असल्याने टोमॅटोचे पीक जोमदार आले. टोमॅटोची गुणवत्ताही चांगली आहे. त्यामुळे वाढीव बाजारभावाचा फायदा श्रीगोंदा, पारनेर, बीड, उस्मानाबाद , बारामती या भागातील शेतकऱ्यांना झाला आहे. सध्या उपबजारातून मुंबईसह दिल्ली, राजकोट, जयपूर, भोपळा येथील बाजारपेठेत रोज वीस मालट्रकमधून टोमॅटो रवाना होत आहे.

खडकवासला धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती

पारनेर शेतकरी झाला लखपती 
ढवळपुरी येथील लिंबाजी चौधरी यांनी दोन एकर क्षेत्रावर चार कोटी लिटर क्षमतेचे शेततळे केले आहे. शेततळ्यातील पाण्याचा वापर करून दहा एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली आहे. त्यासाठी दहा लाख रुपयांचा भांडवली खर्च झाला. जून महिन्यात तोडणी सुरू झाली. आज अखेर १४ हजार टोमॅटो क्रेटचे उत्पादन झाले. विक्रीतुन सुमारे चाळीस लाख रुपये झाले आहेत. अजून तीन हजार क्रेटचे उत्पादन निघेल. नारायणगाव उपबजारात टोमॅटोला चांगला भाव मिळाल्याने मी समाधानी आहे.