esakal | पुणे : रुग्णांना मोठा दिलासा; अखेर शहराला मिळाले ५,९०० रेमडेसिव्हीर
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir

पुणे : रुग्णांना मोठा दिलासा; अखेर शहराला मिळाले ५,९०० रेमडेसिव्हीर

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : जिल्हा प्रशासनाकडून कोविड रुग्णालयांसाठी ५,९०० इंजेक्शनचा साठा सोमवारी उपलब्ध करून देण्यात आला. रुग्णालयातील एकूण खाटांच्या तुलनेत ४० ते ७० टक्के प्रमाणात रेमडेसिव्हीर वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे काही दिवसांपासून रेमडेसिव्हीर इंजक्शनसाठी धावाधाव करणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचं सरासरी वय ४९ वर्षे"

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील एकूण ५११ कोविड रुग्णालयांना हा रेमडेसिव्हीरचा साठा देण्यात आला आहे. या रुग्णालयांमध्ये १२ हजार १३१ खाटांची क्षमता आहे. आज पहिल्या टप्प्यात १८४ कोविड रुग्णालयांना पहिल्यांदाच रेमडेसिव्हीर देण्यात आले. त्यांना खाटांच्या क्षतेच्या तुलनेत ७० टक्के रेमडेसिव्हीर देण्यात आले. तर, उर्वरित ३२७ कोविड रुग्णालयांना खाटांच्या तुलनेत ४० टक्के रेमडेसिव्हीर देण्यात आले. सोमवारी पुणे महापालिका हद्दीतील आणखी १४ कोविड रुग्णालयांचा समावेश झाला आहे. त्यांनाही मंगळवारी रेमडेसिव्हीर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा: ड्रग्ज माफियांना मोठा दणका; भारतीय नौदलानं पकडला ३,००० कोटींचा अंमली पदार्थांचा साठा

जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप सुरू करण्यात आले आहे. कोविड रुग्णालयांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या संख्येनुसार सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार प्राप्त करून घ्यावेत. याबाबत कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, याची खबरदारी रुग्णालय प्रशासन आणि घाऊक विक्रेत्यांनी घ्यावी. कोविड रुग्णालयांनी रेमडेसिव्हीर घेण्यासाठी रुग्णालयाच्या लेटर हेडवर सही, प्राधिकार पत्र आणि प्राधिकृत व्यक्तीचे छायाचित्र हे ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. त्याची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे वितरण करावे.

हेही वाचा: सिंग इज किंग! कोरोना संकटात भज्जीचा पुणेकरांना मदतीचा हात

महापालिका आणि सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांनी औषधाचे वितरण दिलेल्या संख्येनुसार वाटप होत असल्याची खातरजमा करावी. अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

हेही वाचा: चांगली बातमी- मुंबईची ऑक्सिजन चिंता मिटली कारण...

रुग्णालयांना आवश्यकतेनुसार रेमडेसिव्हीरचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. कोविड रुग्णालय नसलेल्या रुग्णालयांनाही रेमडेसिव्हीरची गरज असल्यास त्यांनी संबंधित महापालिका, तालुका किंवा जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकाऱ्याकडून केवळ कोविड रुग्णालय म्हणून नोंद करीत असल्याचे पत्र घ्यावे. त्यांनाही रेमडेसिव्हीर उपलब्ध करून देण्यात येईल, असं आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी केलं आहे.

पुणे जिल्ह्यातील सोमवारची स्थिती :

  1. कोविड रुग्णालये - ५११

  2. खाटांची क्षमता - १२,१३१

  3. रेमडेसिव्हीर उपलब्ध - ५,९००