

उज्ज्वलकुमार ः सकाळ न्यूज नेटवर्क
पाटणा, ता. ३१ : दलितांच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून बिहारमधील दोन प्रमुख दलित नेत्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील चिराग पासवान आणि जीतन राम मांझी यांनी एकमेकांच्या राजीनाम्याची मागणी केली. दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने या वादावर तोडगा काढण्याचे आव्हान आता ‘एनडीए’च्या नेतृत्वापुढे उभे राहिले आहे.
वादाचे मूळ आरक्षणात
या वादाच्या केंद्रस्थानी दलित आरक्षणातील कोटा हा मुद्दा आहे. जीतन राम मांझी यांच्या म्हणण्यानुसार, बिहारमधील २२ दलित जातींपैकी चार जाती वगळता उर्वरित १८ जातींची शैक्षणिक आणि सामाजिक स्थिती अत्यंत मागास आहे. मात्र, आरक्षणाचा मोठा लाभ शैक्षणिकदृष्ट्या तुलनेने पुढारलेल्या जातींनाच मिळत आहे. चिराग पासवान हे याच चार जातींपैकी एका समाजाचे प्रतिनिधित्व करतात, असा मांझी यांचा दावा आहे. त्यामुळे दलित आरक्षणाअंतर्गत वर्गीकरण करून कोट्यातील कोटा निश्चित करावा. यामुळे सर्वांत मागास दलित जातींना आरक्षणाचा अधिक लाभ मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
चिराग यांचा उलटवार
मांझी यांच्या भूमिकेला केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी तीव्र विरोध केला. ‘कोट्यातील कोटा’ ही मागणी दलित समाजाची एकता कमजोर करणारी असल्याचे त्यांनी म्हटले. ‘‘आरक्षणाचा लाभ जीतन राम मांझी यांना मिळाला नाही, असे त्यांना वाटत असेल, तर त्यांनी सर्वप्रथम राजीनामा द्यावा. ते स्वतः आरक्षित मतदारसंघातून निवडून आले आहेत,” असे चिराग यांनी म्हटले. बिहारमध्ये पूर्वी दलित आणि महादलित अशी विभागणी करण्यात आली होती. त्यावेळीही आपल्या पक्षाने त्याला विरोध केला होता, असे त्यांनी सांगितले. दलित समाज एकजूट राहिल्यासच त्यांना त्यांचे हक्क मिळतील, असा दावा चिराग यांनी केला.मांझी यांचे पुत्र आणि बिहार सरकारमधील मंत्री संतोष मांझी यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी यांनी केली आहे.
तेजस्वी यादव यांची टीका
बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मांझी आणि चिराग पासवान यांना लक्ष करीत दलितांच्या नावावर दोन्ही नेते राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या आरक्षित मतदारसंघांमधून राजीनामा देऊन सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे आव्हान तेजस्वी यांनी दिले. सरकारी नोकऱ्यांमध्ये दलितांसाठी राखीव असलेल्या मोठ्या संख्येने जागा रिक्त राहत असल्याचा मुद्दाही तेजस्वी यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.