वाहनांना संरक्षण देणार बाइक ब्लेझर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनांना संरक्षण देणार बाइक ब्लेझर

वाहनांना संरक्षण देणार बाइक ब्लेझर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सातत्याने दुचाकी पावसात पार्क केल्यानंतर ती हळूहळू गंजायला सुरुवात होते. तसेच ती उन्हात उभी केल्यास तिचा रंगदेखील उडतो. त्यामुळे तिच्यावर कव्हर टाकणे हा उत्तम पर्याय. मात्र हे काम मोठे कंटाळवाणे. त्यात कव्हर किती दिवस टिकेल याबाबत काही शाश्‍वती नाही. हे काम खर्चिक आणि कंटाळवाणे असल्याने बऱ्याचदा कव्हर टाकणे टाळले जाते.

वाहनचालकांची हीच अडचण लक्षात घेत, वयाच्या २७व्या वर्षी दिल्लीतील एका तरुणाने २०१६ साली अद्ययावत पद्धतीने गाडीचे कव्हर तयार करण्याचे स्टार्टअप सुरू केले. ‘बाइक ब्लेझर’ (Bike Blazer) असे या स्टार्टअपचे नाव आहे. पाच वर्षांच्या कालावधीत या स्टार्टअपने सुमारे ७५ हजार सेमी-ऑटोमॅटिक बाईक कव्हर्सची विक्री केली आहे. सध्या या स्टार्टअपची वार्षिक उलाढाल एक कोटी तीस लाख रुपये आहे. या स्टार्टअपचे संस्थापक केशव राय यांनी २०१५ साली अॅप-आधारित एक स्टार्टअप सुरू केले होते. ज्यात त्यांना अपयश आले होते. मात्र या स्टार्टअपने त्यांची वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

हे स्टार्टअप दुचाकी पार्किंग कव्हर तयार करते. जे पाणी, धुळ आणि उन्हापासून बार्इकचे संरक्षण करते. सेमी-ऑटोमॅटिक असलेले हे कव्हर ३० सेकंदांपेक्षा कमी वेळेत दुचाकीवर टाकता किंवा काढता येऊ शकते. या स्टार्टअपबाबत राय यांनी सांगितले की, दुचाकी झाकून ठेवणे हे अनेकांसाठी कंटाळवाणे काम आहे. कारण त्यासाठी वेळ जातो व ते कव्हर ठेवायचे कुठे असा प्रश्‍न त्यांच्यासमोर असतो. या दोन्ही समस्या आमच्या स्टार्टअपने सोडवल्‍या आहेत. आमचे कव्हर गाडीवर टाकणे सोपे असून, ते फक्त हँडल फिरवून डिव्हाइसमध्ये परत येते. कव्हर गाडीच्या जाळीला एका छोट्या बॉक्समध्ये ठेवता येते. त्यामुळे त्याला सांभाळण्याचीदेखील कटकट राहत नाही.

हेही वाचा: आझाद मैदानात आंदोलक संतप्त; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

अशी सुचली कल्पना...

राय हे एक दिवस घरी येत असताना दिल्लीतील कौशांबी मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमध्ये काही वेळ बसले. त्यावेळी त्यांना एक दुचाकीधारक दिसला जो त्याची दुचाकी पुसण्यासाठी कापड शोधत आहे. मात्र काहीच न सापडल्याने त्याने शेजारील दुचाकीवरील डस्टर घेतले व गाडी पुसली. गाडी स्वच्छ करण्यासाठी कोणावर एखादी वस्तू चोरून वापरण्याची वेळ येत असेल, तर ती खराब न होण्यासाठी काही करता येईल का, या विचारातून या स्टार्टअपची सुरुवात झाली.

स्टार्टअपची वैशिष्ट्ये...

  • सेमी-ऑटोमॅटिक कव्हर तयार करणारे देशातील पहिले स्टार्टअप

  • पाणी, धूळ आणि उन्हापासून बाइकचे होते संरक्षण

  • कव्हर ३० सेकंदांपेक्षा कमी वेळेत दुचाकीवर टाकता किंवा काढता येतो

  • फक्त हँडल फिरवून कव्हर त्याच्या डिव्हाइसमध्ये परत येतो

  • कव्हर काढून तो गाडीलाच ठेवणे सोपे

loading image
go to top