चाकण - बिरदवडी (ता. खेड) येथील अनोळखी तरुणाच्या खूनप्रकरणी वीस दिवसांच्या तपासानंतर तीन आरोपींना अटक केली आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे उघड झाला आहे..याप्रकरणी आरोपी निखिल नानासाहेब चव्हाण (वय २१, सध्या रा. खराबवाडी ता. खेड, मूळ रा. काथनेश्वर, पो. धसाडी ता. गंगाखेड, जि. परभणी), त्याचा मित्र स्वप्निल नरहरी पारधी (वय १९, रा. सध्या रा. खराबवाडी, मूळ रा. ढोकी ता. जि. नांदेड), उषा नानासाहेब चव्हाण (वय ४०, रा. गंगाखेड, जि. परभणी) या तिघांना अटक केली असल्याची माहिती चाकण उत्तर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिली..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाखेड येथील मुंजा धोंडीबा नरहिरे (वय २५) व आरोपी महिला यांचे अनैतिक संबंध होते. त्यावरून झालेल्या वादातून आरोपींनी मुंजा याचा खून केला आहे. मुंजा याचा मृतदेह बिरदवडी येथे ११ जानेवारीला पोलिसांना मिळाला होता. मात्र, मृतदेहाजवळ काहीच मिळाले नव्हते. त्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता.पोलिसांनी त्या मृतदेहाचे रेखाचित्र तयार करून समाज माध्यम व वृत्तपत्रात प्रसिद्ध केले होते. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसेच परिसरातील लोक, कंपन्यांतील कामगार, कामगार अड्डे यांना मृत तरुणाचा फोटो दाखवून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. पोलिस ठाण्यात बेपत्ता असलेल्या व्यक्तींच्या नोंदी तपासल्या..गुन्ह्यात वापरलेली दुचाकीची माहिती मिळाली. त्याचा शोध पोलिसांनी घेतला. त्या दुचाकी मालकाकडे चौकशी केल्यानंतर त्याने आरोपी मित्र निखिल नानासाहेब चव्हाण याला जानेवारीला दुचाकी दिल्याचे सांगितले. त्यानंतर निखिलचा शोध पोलिसांनी घेतला. त्याची विचारपूस केली असता त्याने सांगितले की, मुंजा नरहिरे व त्याची आई आरोपी महिला यांचे अनैतिक संबंध होते.मुंजा तिला त्रास देत होता. त्यामुळे आरोपी, त्याचा मित्र व महिला यांनी मुंजा याला गंगाखेड येथून चाकण येथे बोलावले. गंगाखेड येथून मुंजा हा चाकण येथे बसने आला. ७ जानेवारीला सकाळी चाकण येथून दुचाकीवर त्याला बसवले दारू पिण्याच्या बहाण्याने त्याला बिरदवडी गावच्या ओढ्यालगत नेले..त्या ठिकाणी नेऊन ते दारू पीत असताना आरोपी निखिल व स्वप्निल यांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने, तसेच तोंडावर मारहाण केली व त्याचा खून केला. त्याची ओळख पटू नये याकरिता त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा चेहरा छिन्नविच्छिन्न करून त्याच्या जवळील सर्व वस्तू काढून घेतल्या.मृतदेहाची ओळख पटवण्याकरिता कोणताही पुरावा नसताना चाकण उत्तर पोलिस ठाण्यातील अधिकारी व तपास पथकातील पोलिसांनी सलग वीस दिवस तपास करून या गुन्ह्यातील खून झालेल्या व्यक्तीचा शोध लावला. तसेच, तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्हा कबूल करून घेतला..ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलिस आयुक्त बसवराज तेली, अप्पर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, पोलिस उपायुक्त मारुती जगताप, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस निरीक्षक गुन्हे विनोद पाटील, तपास पथकातील अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, सहाय्यक पोलिस फौजदार सुनील शिंदे, पोलिस हवालदार भैरोबा यादव, प्रीतम ढमढेरे, योगेश कोळेकर, पोलिस शिपाई शिवाजी लोखंडे, महेश कोळी, शरद खैरनार, सुमीत जगताप यांनी केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.