अतिउत्साही छायाचित्रकारांमुळे पक्ष्यांच्या जीवनशैलीत अडथळा

अतिउत्साही छायाचित्रकारांमुळे पक्ष्यांच्या जीवनशैलीत अडथळा

पुणे - ‘‘या हौशी फोटोग्राफर्सपासून आम्हाला वाचवा हो...’’ थंडीमध्ये पुण्यात पाहुणे म्हणून आलेल्या देशी-परदेशी पक्ष्यांना बोलता येत असते तर त्यांनी नक्कीच असे उद्‌गार काढले असते. ही हौशी मंडळी पक्ष्यांना दगड मारून उडायला भाग पाडतात, प्रक्रियायुक्त अन्न खायला घालतात आणि एवढेच नव्हे, तर त्यांच्याशी नको इतकी जवळीक करतात, त्यामुळे त्यांच्या नैसर्गिक हालचालींतच अडथळा येत आहे... त्यामुळेच ‘निसर्गप्रेमी’, ‘पर्यावरणवादी’ असे म्हणण्यात येत असलेले हे छायाचित्रकारच पर्यावरणाचे मारेकरी ठरू लागले आहेत.

थंडीचा कडाका काहीसा जाणवू लागला, की अनेक कथित ‘पक्षिमित्र’ आणि विशेषतः हौशी फोटोग्राफर्स पाणवठ्याकडे वळू लागतात ते सृष्टीने भरविलेल्या पक्षी- संमेलनाचे साक्षीदार होण्यासाठी; पण पक्ष्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आजकाल हौशी फोटोग्राफर्सचा अतिरेक पाहायला मिळतो. 

हिवाळ्यात बर्फाच्छादित प्रदेशातील हजारो पक्षी स्थलांतर करू लागतात. लांब पल्ल्याचा प्रवास करून विविध प्रजातींचे हे पक्षी देशाच्या विविध भागांत विसाव्यास येतात. देश-विदेशांतील स्थलांतरित पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने पाणवठ्यांवर मोठ्या संख्येने येणारे पक्षी, हा मुख्य आकर्षणाचा विषय असतो. गेल्या काही वर्षांपासून ‘या पाहुण्या पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटन’ असा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. या पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी अभ्यासक नियमितपणे पाणवठ्यांवर जात असतात. या वर्षी पुण्याच्या बाहेरीलबाजूला मोठ्या संख्येने दिसणाऱ्या या पाहुण्या पक्ष्यांनी शहरातही काही ठिकाणी मुक्काम ठोकल्याचे पाहायला मिळते. म्हणूनच की काय, आता भिगवण, कवडीपाट याबरोबरच मुळा-मुठा नदी परिसर, पाषाण, खाणींच्या परिसरात पाहुण्या पक्ष्यांच्या किलबिलाटासह... हौशी फोटोग्राफर्सचा ‘क्‍लिकक्‍लिकाट’ ऐकू येत आहे.

छायाचित्रण हा पक्षी निरीक्षणातील महत्त्वाचा भाग मानला जातो. पक्ष्यांच्या नव-नव्या प्रजाती, त्यांची संख्या, जीवनशैली, अधिवास याचा अभ्यास करण्यासाठी छायाचित्रण महत्त्वाचे ठरते; परंतु आता हेच छायाचित्रण पक्ष्यांच्या जीवनशैलीस अडथळा ठरू लागले आहे.

‘लाइक्‍स’साठी ‘क्‍लिक’ घातक
पक्षी अभ्यासक हेमंत धाडणेकर म्हणाले, ‘‘भिगवणमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी येतात. सध्या येथे जवळपास २४२ प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात. रोहित पक्ष्याबरोबरच (फ्लेमिंगो) कॉमन टिल, ग्रे हेरॉन, युरेशियन पूट, ब्राह्मणी बदक हे मोठ्या संख्येने दिसत आहेत. पुण्यातही पाषाण तलाव, मुळा-मुठा नदीकिनारा, टेकड्यांवरील खाणींमध्ये 

स्थलांतरित पक्षी उतरले आहेत; परंतु छायाचित्रणाच्या नावाखाली या पक्ष्यांच्या जीवनशैलीत ढवळाढवळ होत असल्याचे दिसून येते. फेसबुकवर फोटो अपलोड करण्यामागे असणारे हौशी फोटोग्राफर्स आजकाल पाणवठ्यांच्या आजूबाजूला फिरताना दिसतात. त्यातील अनेक जण जास्तीत जास्त लाइक्‍स मिळविण्यासाठी एका ‘क्‍लिक’च्या शोधात असतात. परंतु, त्यासाठी तासन्‌तास प्रतीक्षा करण्याइतपत वेळ त्यांच्याकडे नसतो. म्हणून अल्पावधीत बऱ्यापैकी चांगला फोटो मिळविण्यासाठी असे फोटोग्राफर्स पक्ष्यांना दगड मारून उडवून लावतात, त्यामुळे या पक्ष्यांच्या जीवनशैलीस अडथळा निर्माण होत आहे.’’

पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासांवर छायाचित्रकारांचे होणारे अतिक्रमण ही चिंतेची बाब ठरत आहे. अलाइव्ह संस्थेचे उमेश वाघेला म्हणाले, ‘‘काही व्यावसायिक फोटोग्राफर्स पक्ष्यांच्या अगदी जवळ जाऊन कॅमेरा लावून बसतात. अनेक स्थलांतरित पक्षी हे छोट्या-छोट्या डबक्‍यांवरही येत असतात. या डबक्‍यांच्या जवळच म्हणजे अगदी पाच ते सहा फूट अंतरावर कॅमेरा लावून बसलेले छायाचित्रकारही निदर्शनास येतात. खरंतर पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी छायाचित्रण हा उत्तम पर्याय आहे; परंतु चांगल्या फोटोसाठी पक्ष्यांना चपातीचे तुकडे, शिळा भात असे प्रकिया केलेले अन्न खायला घालणे चुकीचे आहे. हे अन्न खाऊन पक्ष्यांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, हे समजून घ्यायला हवे. खरंतर फोटोग्राफर्सने पक्ष्यांचा अधिवास संरक्षित राहावा, यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.’’

पक्षी संमेलन भरलेल्या जागा :
- शहरातील ठिकाणे : पाषाण तलाव, मुळा-मुठा नदीकिनारे, टेकड्यांवरील खाणी
- शहराबाहेरील ठिकाणे : भिगवण, कवडी पाठ, वीर धरण


स्थलांतरित पक्ष्यांची मुक्कामाची ठिकाणे :
पाणवठ्यावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांबद्दल नेहमी बोलले जाते. अर्थात, पाणवठ्यांवर येणाऱ्या पक्ष्यांची संख्या तुलनेने अधिक असते, त्यामुळे ते सहज डोळ्यांना दिसतात, म्हणून त्यांची उपस्थिती प्राधान्याने नोंदविली जाते. परंतु, पाणवठ्यांबरोबरच इतर ठिकाणीही देश-विदेशांतून स्थलांतरित पक्ष्यांचे याच हंगामात आगमन होते. माळरान, जंगल परिसरातही स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात.

पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना
हौशी फोटोग्राफर्ससाठी हवी मार्गदर्शक तत्त्वे
वन विभागाने स्थलांतरित पक्ष्यांचा हंगाम सुरू होण्याआधी पक्षिप्रेमी, अभ्यासक, छायाचित्रकारांची कार्यशाळा घ्यावी.
स्थलांतरित पक्ष्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी वन विभागाने सूचना फलक लावावेत.
छायाचित्रकारांनी स्वतः काही अटींचे पालन करण्यासाठी कटिबद्ध असावे.

स्थलांतरित पक्षी
रोहित पक्षी (फ्लेमिंगो), शेकट्या, कॉमन टिल, ग्रे हेरॉन, युरिशयन पूट, ब्राह्मणी बदक, करड्या रंगाचं डोकं असणारी टिटवी, युरेशियन स्पून बिल, ग्रेटर स्पॉटेड ईगल आदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com